China Coal Mine : चीनच्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृ्त्यू
China Coal Mine : चीनच्या शांक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत 90 कामगारांचा मृत्यू झाला आहे. राजधानी बीजिंगपासून हा भाग 520 किलोमीटर अंतरावर आहे. ही दुर्घटना घडण्याआधी कार्बन मोनोऑक्साइड गॅसचा अलर्ट जारी करण्यात आला होता.

चीनच्या शांक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत 90 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 9 जण अजूनही बेपत्ता आहेत. मागच्या एक दशकातील ही चीनमधील सर्वात मोठी कोळसा खाण दुर्घटना आहे. शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शांक्सी प्रांताच्या किनयुआन काउंटीमध्ये एका कोळसा खाणीत ही दुर्घटना घडली. राजधानी बीजिंगपासून हा भाग 520 किलोमीटर अंतरावर आहे. ही दुर्घटना घडण्याआधी कार्बन मोनोऑक्साइड गॅसचा अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने हा स्फोटो झाला. त्यावेळी खाणीत 247 कामगार काम करत होते. स्फोटानंतर अनेक मजुरांना बाहेर काढण्यात आलं. पण अनेक लोक आत अडकले होते.
आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथक बेपत्ता मजुरांचा शोध घेत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बचाव पथकांना बेपत्ता मजुरांना शोधून काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे असा आदेश दिला आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
शांक्सी हा चीनमधला सर्वात मोठा कोळसा उत्पादन करणारा प्रांत
शांक्सी हा चीनमधला सर्वात मोठा कोळसा उत्पादन करणारा प्रांत आहे. चीनने मागच्या काही वर्षात कोळसा खाणीची सुरक्षा चांगल्या दर्जाची केल्याचा दावा केला आहे. मात्र, तरीही दुर्घटना थांबलेल्या नाहीत. फेब्रुवारी 2023 साली मंगोलियाच्या कोळसा खाणीत भूस्खलन झालं होतं. यात 53 मजुरांचा मृत्यू झालेला. मागच्या महिन्यात शांक्सीमध्येच लुलियांग भाग कोळसा खाण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालेला.
चीनमध्ये सध्या पावसाळा
सर्व सरकारी विभाग आणि राज्यांनी या दुर्घटनेपासून धडा घेतला पाहिजे असं जिनपिंग यांनी म्हटलं आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम अजून मजबूत केले पाहिजेत. जेणेकरुन भविष्यात अशा घटना होणार नाहीत. चीनमध्ये सध्या पावसाळा सुरु आहे. म्हणून पूर आणि नैसर्गिक संकटांपासून बचाव करण्यासाठी सुद्धा मजबूत तयारी ठेवा असं सांगितलं आहे. बेपत्ता मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा असं चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटलं आहे.