कट्टर शत्रू एकमेकांना भेटणार…? डोनाल्ड ट्रम्प-मोजतबा खामेनी यांच्या भेटीबाबत सर्वात मोठी अपडेट
Trump Khamenei Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची भेट घेण्याबाबत भाष्य केले होते. आता या भेटीबाबत इराणकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये अद्याप युद्धबंदीचा करार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला याचा फटका बसला आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची भेट घेण्याबाबत भाष्य केले होते. त्यामुळे या दोन्ही कट्टर शत्रूंची भेट होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. अशातच आता या भेटीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची भेटीबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बस अराघची यांनी भाष्य केले आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अल जझीराच्या एका रिपोर्टनुसार, अब्बास अराघची यांनी सांगितले की, ‘मी एक रिपोर्ट पाहिला ज्यामध्ये म्हटले होते की ट्रम्प बैठकीसाठी तयार आहेत किंवा भेट घेऊ इच्छितात. पण मला वाटते की आपण वास्तव समजून घेतले पाहिजे. वास्तवाच्या जगात जगले पाहिजे.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले होते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले होते की, ‘जर इराणसोबत करार होण्यास मदत होत असेल तर मी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची भेट घेण्यासाठी तयार आहेत. त्यांना भेटणे हा आपल्यासाठी सन्मानाचा विषय असेल आणि मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करेल.’ पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हेही मान्य केले की खामेनी हे त्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व नाहीत.
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते, ‘मी भेट घेण्याचा आग्रह करत नाही. पण जर भेट झाली, तर त्यांना भेटून मला सन्मान वाटेल. आपण काही करार करू शकतो का, हे पाहायला हवे. जर करार झाला तर मी त्यांना भेटू शकतो. मला भेटीसाठी काही अडचण नाही. मी स्वतः हा प्रस्ताव दिला नव्हता. काही लोकांनी हा प्रस्ताव मांडला आहे. जर असे झाले, तर मी आदर दाखवेन.’
अमेरिका-इराण संघर्षामुळे तणाव कायम
दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून पेट्रोलचे दरही वाढले आहेत. इराण या संघर्षात मागे हटण्याच्या तयारीत नाही. तसेच अमेरिकेमध्येही युद्धविरोधी भावना अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे.