France Fire : महागाईच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी शहर पेटवलं, दुकानं लुटली

फ्रान्समध्ये महागाईताली आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही आंदोलकांनी जाळपोळ करत दुकानं लुटली.

France Fire : महागाईच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी शहर पेटवलं, दुकानं लुटली
france fire
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 11:07 AM

फ्रान्समध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन भडकलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. संतापलेल्या काही आंदोलकांनी जाळपोळ, दुकानांची लूट आणि शासकीय इमारतींची नासधूस केली. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पाण्याचा फवारा देखील मारला. या घटनेने संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. महागाईच्या विरोधातील आंदोलनात हजारो लोकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. फ्रेंच गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, आंदोलनात जवळपास 550000 लोक सहभागी झाले आहेत. तर युनियनने हा आकडा 80000 सांगितला आहे. तर 400 हून अधिक जणांना अटक केल्याची देखील माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढती महागाई, महाग इंधन, शिक्षण व्यवस्थेतील समस्या आणि सार्वजनिक सेवांमधील त्रुटींमुळे फ्रान्समध्ये सरकारविरोधातील असंतोष उफाळून आलाय.  शनिवारी फ्रान्स सरकारविरोधात साडेपाच लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरले.   राजधानी पॅरिसमध्येच 1 लाख 10 हजार नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शने केली.  सष्टेंबर महिन्यात शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाचं आता व्यापक जनआंदोलनात रुपांतर झालंय.

Loading...

आंदोलनाला विविध सामाजिक घटकांचा पाठिंबा 

फ्रान्समधील या आंदोलनाची सुरुवात सप्टेंबरच्या मध्यात पॅरिसजवळील क्रेतेई या उपनगरातील एका माध्यमिक शाळेतून झाली.  शाळांच्या मोडकळीस आलेल्या इमारती, वर्गांमध्ये वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणातील असमानता या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता. शैक्षणिक संस्थांमधील अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची भावना आंदोलनामागे आहे. मात्र, आंदोलन जसजसे पुढे गेले, तसतसे त्याला विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विविध सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळू लागलाय.  आता शिक्षक, पालक, परिचारिका, अग्निशमन दलाचे कर्मचारी, मानवी हक्कांसाठी काम करणारे वकील आणि कामगार संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.

हिंसक वळणानंतर 400 जणांना अटक 

महागाईने खर्च वाढला असून वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे नागरिक, निवृत्त कर्मचारी आणि इतर कामगार वर्गही या आंदोलनाशी जोडले गेले. त्यामुळे हा प्रश्न केवळ शाळांच्या सुधारणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शिक्षण, रोजगार, उत्पन्न, सार्वजनिक आरोग्यसेवा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित अनेक प्रश्न या आंदोलनातून पुढे आले आहेत. शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान बहुतांश नागरिकांनी शांततापूर्ण मोर्चांमध्ये सहभाग घेतला. मात्र, काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.  पॅरिसमध्ये काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने फटाक्यांसारखी स्फोटक साधने फेकल्याचे आणि एका कारसह वृत्तपत्र विक्रीच्या स्टॉलला आग लावल्याचे वृत्त आहे. मार्सेल या दक्षिण फ्रान्समधील शहरात आंदोलकांनी महापालिकेच्या इमारतीत प्रवेश केला आणि काही दुकानांमध्ये लूटमार झाल्याचे वृत्त आहे. लियॉनमध्ये पर्यटन कार्यालयाला आग लावण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली. रेनेस, तुलूझ आणि आंजे यांसारख्या शहरांमध्येही हिंसक घटनांची नोंद झाली. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, हिंसक घटनांनंतर किमान 400 जणांना अटक करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us