
Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा चांगलाच भडका उडाला आहे. हे दोन्हीही देश युद्धात माघार घेण्यास तयार नाहीत. या युद्धात इस्रायलच्या सोबतीने अमेरिकादेखील इराणवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. इराणनेही आता जास्तच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आता इराणच्या आणखी एका बड्या नेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक तसेच अन्य जवळच्या काही व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) जवान तैनात होते. प्राप्त माहितीनुसार अहमदीनेजाद हे एका इमारतीत आपल्या टीमसह आश्रयाला होते. याच इमारतीवर शनिवारी हल्ला करण्यात आला. इराणची राजधानी तेहरानाच्या उत्तर-पूर्व भागात ही इमारत होती. याच भागात माजी राष्ट्रपती अहमदीनेजाद यांचे निवासस्थानही आहे.
इस्रायलने केलेल्या या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये हल्ल्यानंतर अहमदीनेजाद यांच्या निवासस्थान परिसरात कसा विध्वंस झाला हे दाखवण्यात आले आहे. या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी आम्ही जशास तसे उत्तर देत राहू. आम्ही अमेरिकेच्या तसेच इस्रायलच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त करत राहू, असा इशारा दिलेला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आतापर्यंत कुवैत, कतार, इराक, सैदी अरेबिया या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. याशिवाय इराणने संयुक्त अरब अमिरातीवरही हल्ला केला आहे. असे असताना आता इराणच्या माजी राष्ट्रपतींचाही मृत्यू झाल्यामुळे इराण भविष्यात काय करणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.