एक गॅस सिलिंडर 10 हजारात, पगार करायला पैसे नाहीत, पाकमध्ये आर्थिक हाहाकार; पाकिस्तानचा श्रीलंका होतोय?

| Updated on: Jan 05, 2023 | 9:31 AM

सरकारी कार्यालयातील विजेचा वापर कमी व्हावा म्हणून हा पर्याय निवडण्यात आला आहे. तसेच जुलै 2023पर्यंत देशातील इलेक्ट्रिक पंख्यांचं उत्पादन बंद करणअयात आलं आहे.

एक गॅस सिलिंडर 10 हजारात, पगार करायला पैसे नाहीत, पाकमध्ये आर्थिक हाहाकार; पाकिस्तानचा श्रीलंका होतोय?
एक गॅस सिलिंडर 10 हजारात, पगार करायला पैसे नाहीत, पाकमध्ये आर्थिक हाहाकार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कराची : श्रीलंकेत जे घडलंय तेच आता पाकिस्तानमध्ये घडताना दिसत आहे. पाकिस्तान प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानात ऊर्जा संकटही आलं आहे. ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानात मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद करण्याची वेळ ठरवण्यात आली आहे. अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादन थांबवण्यात आलं आहे. एवढच नव्हे तर लोक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या थैलीत भरून आणत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर दहा हजार रुपयात विकला जात आहे. तसेच कामगारांचे पगार करायलाही पैसे नाहीयेत.

चीनच्या कर्जामुळे श्रीलंका डबघाईला आला होता. त्याचप्रमाणे आता पाकिस्तानही चीनच्या कर्जामुळे वाकला आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्रं डॉनच्या नुसार, मार्च 2022पर्यंत पाकिस्तानवर एकूण 43 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालं होतं.

हे सुद्धा वाचा

इमरान खान यांच्या काळात सर्वाधिक आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली. इमरान खान यांनी तीनच वर्षात देशातील जनतेवर रोज सुमारे 1400 कोटींचा कर्ज टाकलं. एकंदरीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे.

पाकिस्तानचे विदेशी मुद्रा भंडार गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉल झालं आहे. बाहेरच्या देशांचं कर्ज फेडण्यात येत असल्याने ही कमतरता ओढवली आहे. श्रीलंकेतही अशाच प्रकारे विदेशी मुद्रा भंडार कमी झाला होता.

त्यामुळे श्रीलंकेत इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट आलं होतं. याशिवाय 2022-2023च्या जुलै-ऑक्टोबर या तिमाहीत पाकिस्तानातील महसूली घट जीडीपीच्या 1.5 क्के राहिली. देश गंभीर स्थितीतून जात आहे. असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ ख्वाजा यांनीही सांगितलं.

पंखे, बल्बचं उत्पादन बंद

देशावरील आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि सरकारी खजिन्यावरील ताण कमी करण्यासाठी शहबाज शरीफ सरकारने त्वरीत उपाय योजना केल्या आहेत. सामान्य नागरिकांना सुविधा देण्यात पाकिस्तान असमर्थ ठरत आहे, अशी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची हालत झाली आहे. वीज वाचवण्यासाठी विविध पावलं उचलली आहेत. तसेच वर्क फ्रॉम होमची पॉलिसीही लागू करण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयातील विजेचा वापर कमी व्हावा म्हणून हा पर्याय निवडण्यात आला आहे. तसेच जुलै 2023पर्यंत देशातील इलेक्ट्रिक पंख्यांचं उत्पादन बंद करणअयात आलं आहे. तसेच बल्बची निर्मिती बंद करणअयाचा निर्णयही घेण्यात आला आहे.

प्लास्टिक थैलीत घरगुती गॅस

पाकिस्तानमध्ये गॅसचंही संकट निर्माण झालं आहे. प्लास्टिकचे फुगे किंवा प्लास्टिकच्या बॅग्जमध्ये एलपीजी गॅस भरून नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याबाबतचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील नागरिक प्लास्टिक बॅगेत घरगुती गॅस भरून नेताना या व्हिडीओत दिसत आहेत.

घरगुती गॅसची कमतरता निर्माण झाल्याने लोक त्याची साठवणूक करताना दिसत आहे. हंगू सारख्या शहरात तर लोक घरगुती गॅस शिवाय जीवन जगताना दिसत आहेत. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये एका कमर्शियल गॅससाठी पाकिस्तानात 10 हजार रुपये मोजले जात आहेत.

उघड्यावर बैठका, बाजार बंद

विजेची बचत करण्यासाठी पाकिस्तानात मार्केट, लग्नाचे हॉल ठरावीक वेळेत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व सरकारी बैठका दिवसा आणि उघड्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटने ऊर्जा बचत करण्यासाठी आणि आयात तेलावरील निर्भयता कमी करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पगार लटकले

पाकिस्तान सरकारकडे कामगारांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. यात रेल्वे विभागाची हालत सर्वाधिक बेक्कार आहे. गेल्या वर्षभारत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीची रक्कम देण्याएवढाही पैसा पाकिस्तानच्या रेल्वेकडे नाही.

एकूण 25 अब्ज रुपये ग्रॅच्युएटीपोटी द्यायचे आहेत. शिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याएवढा पैसाही त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. पूर्वी महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळायचा. आता 20 तारखेला पगार दिला जात आहे.