Iranian woman Shamim Mafi arrest : अमेरिका–इराण तणावात मोठा ट्विस्ट! लॉस अँजिलिसमध्ये महत्वाच्या व्यक्तीला अटक
अमेरिका-इराण शांतता चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने लॉस एंजेलिस विमानतळावर इराणी महिला शमिम माफीला अटक केली आहे. तिच्यावर इराण आणि सुदान यांच्यात ड्रोन, बॉम्बसह शस्त्रास्त्रांच्या ७० लाख डॉलरहून अधिक किमतीच्या तस्करीमध्ये मध्यस्थी केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव वाढला असून, माफीला २० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

एकीकडे अमेरिका- इराण दरम्यान होणाऱ्या शांतता चर्चेकडे जग डोळे लावून बसलं आहे. पाकिस्तानच चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे. अमेरिकेने चर्चेसाठी तयारी दाखवली असली तरी त्यांच्या अटींमुळे संतापलेला इराण अद्याप चर्चेस तयार नाही. युद्धविरा 22 एप्रिल रोजी संपणार असून त्यापूर्वी शांतता चर्चा होऊन काही तोडगा निघतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान इराणला एक तगडा झटका बसला आहे. शमिम माफी या 44 वर्षीय इराणी महिलेला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर अटक करण्यात आली. तिच्यावर इराण आणि सुदान यांच्यात ड्रोन आणि बॉम्बसह शस्त्रास्त्रांच्या सौद्यांमध्ये मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, शमिम माफी चालवत असलेल्या कंपनीमार्फत ही शस्त्रे आणि दारूगोळ्याची तस्करी करण्यात आली होती, ज्या कंपनीला 2025 मध्ये 70 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम मिळाली होती.
इराण आणि सुदानी सशस्त्र दलांमध्ये ड्रोन, बॉम्ब, बॉम्बचे फ्यूज आणि लाखो राउंड दारुगोळ्याच्या विक्रीत मध्यस्थी केल्याबद्दल त्या इराणी महिलेवर आरोप ठेवण्यात येतील, असे अमेरिकेचे फर्स्ट अॅटर्नी बिल एस्ले यांनी रविवारी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, यामध्ये त्या महिलेचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.
अटकेचे फोटोही समोर
यांसदर्भात काही फोटो शेअर करण्यात आले असून, त्यापैकी एकामध्ये, लॉस अंएंजेलिस विमानतळ (LAX) टर्मिनलबाहेर एफबीआयचे जॅकेट घातलेला एक माणूस एका महिलेला सेडान गाडीच्या मागच्या सीटवर जबरदस्तीने बसवताना दिसत होता, आणि दुसऱ्या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड दिसत होती. याव्यतिरिक्त अधिक तपशील देण्यात आलेला नाही. एसईसीने पुढे म्हटले आहे की, “माफी ही एक इराणी नागरिक आहे, जी 2016 साली अमेरिकेची कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी बनली” अशी माहिती समोर आली.
किती वर्षांची शिक्षा होऊ शकते ?
दोषी ठरल्यास, शमिम माफीला जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिच्यावर इराणला सुदानमध्ये शस्त्रे तस्करी करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. एपीच्या वृत्तानुसार, माफी आणि तिचा एक अज्ञात साथीदार ओमानमध्ये ‘ॲटलस इंटरनॅशनल बिझनेस’ नावाची कंपनी चालवत होते, जी शस्त्रांची तस्करी करत असे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, त्या दोघांनी सुदानच्या संरक्षण मंत्रालयाला 55 हजार बॉम्ब फ्यूजच्या विक्रीत मध्यस्थी केली होती. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 70 लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या इराणी बनावटीच्या मोहजर-6 सशस्त्र ड्रोनच्या करारांचाही या विक्रीत समावेश होता. माफी डिसेंबर 2022 ते जून 2025 दरम्यान इराणी गुप्तचर संस्थांच्या थेट संपर्कात होती. मिळालेल्या माहितीनुसार, या इराणी महिलेला सोमवारी लॉस एंजेलिसमधील यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टात हजर केले जाईल.