अमेरिकेसोबतचे युद्ध थांबताच इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा आदेश, म्हणाला…

मुज्तबा खामेनेई यांनी लष्कराला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असून डोनाल्ड ट्रम्प यांनी २ आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. इराणमध्ये जल्लोषाचे वातावरण असून युद्धाच्या ३९ व्या दिवशी काय घडले, याची सविस्तर माहिती.

अमेरिकेसोबतचे युद्ध थांबताच इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा आदेश, म्हणाला...
Mujtaba Khamenei
| Updated on: Apr 08, 2026 | 8:32 AM

गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी आपल्या सर्व लष्करी तुकड्यांना तात्काळ गोळीबार थांबवण्याचे (Ceasefire) आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे आखाती देशांमधील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबी (IRIB) वरून नुकतंच याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. या प्रसारित झालेल्या निवेदनात इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. हा युद्धाचा कायमस्वरूपी अंत नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्व लष्करी गटांनी सर्वोच्च नेत्याच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व लष्करी तुकड्यांनी तात्काळ गोळीबार थांबवावा, असे आदेश इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी दिले आहेत. या घोषणेनंतर इराणच्या सीमेवर शांतता पसरली असून लष्करी हालचाली थांबवण्यात आल्या आहेत.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आणि चेतावणी

तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर इशारा दिला आहे. जर इराणने माघार घेतली नाही, परिस्थिती बदलली नाही तर आज रात्रीच एका प्राचीन सभ्यतेचा कायमचा अंत होऊ शकतो. आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसेच होईल. कदाचित काही क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकते, कोण जाणे काय होईल? असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

या इशाऱ्यानंतर काही तासांतच इराणच्या अनेक शहरांवर अमेरिकेने जोरदार एअरस्ट्राईक केले होते. त्यानंतरच ही युद्धविरामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, सीजफायरची बातमी समजताच राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. हातात इराणचे राष्ट्रध्वज घेऊन लोक युद्धविरामाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

विविध हल्ल्यात १५ निष्पाप लोकांचा बळी

गेल्या २४ तासांत युद्धाची भीषणता अधिकच वाढली होती. इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या विविध हल्ल्यात १५ निष्पाप लोकांचा बळी गेला. तर ५३ जण जखमी झाले. इराणचे पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या कोममधील एका निवासी इमारतीवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ५ रहिवासी मारले गेले. इराणने हा जागतिक तेल व्यापाराचा मार्ग बंद करण्याची धमकी दिली होती.

या युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वदेशातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जेक ऑचिनक्लॉस यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील असे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी स्वतःहून युद्ध सुरू केले आणि त्यात ते अपयशी ठरले, अशा शब्दात जेक ऑचिनक्लास यांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us