आधी आरोपीकडून मसाज, आता आरोपीसोबत हॉटेलमध्ये जेवण, बार्शी पोलिसांचा प्रताप

| Updated on: Jun 19, 2019 | 10:41 PM

हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. बार्शी पोलिसांचा हा प्रताप ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आधी आरोपीकडून मसाज, आता आरोपीसोबत हॉटेलमध्ये जेवण, बार्शी पोलिसांचा प्रताप
Follow us on

सोलापूर : या ना त्या कारणावरुन नेहमी वादात असणारे बार्शी पोलीस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. बार्शी पोलिसांचा हा प्रताप ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशाप्रकारे हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितासोबत सार्वजनिक ठिकाणी जेवण करणाऱ्या या बार्शी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

गेल्या 29 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास बार्शी येथे अंकुल उर्फ गोल्या चव्हाण हा घरी आपल्या मुलीला खेळवत बसला होता. तेव्हा त्याच्यावर एका अज्ञात तरुणाने तलवारीने हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सुरज चव्हाण, दीपक माने, सुरज मानेसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, बार्शी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील चार जणांना अटक केली. तर उर्वरित आरोपी फरार होते. त्यामुळे मागील आठवड्यात मृत अंकुल चव्हाणच्या नातेवाईकांनी उर्वरित फरार आरोपीच्या अटकेसाठी उपोषण केले होते.

त्यानंतर झोपेतून जागे झालेल्या बार्शी पोलिसांनी किरण गुळवे या संशयिताला अटक केली. तर या प्रकरणातील इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी (18 जून) बार्शी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर या आरोपीची न्यायालयातून थेट पोलीस कोठडीत रवानगी होणे अपेक्षित होते. मात्र, बार्शी पोलिसांनी संशयित आरोपी किरण गुळवे याला बार्शीतील एका हॉटेलमध्ये जेवण करायला नेलं आणि त्याच्यासोबत एकाच टेबलावर बसून जेवणही केलं. बार्शी पोलिसांचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे पोलीस आरोपीला अशाप्रकारे व्हीआयपी ट्रिटमेन्ट कसं देऊ शकतात, असा सवाल अंकुल चव्हाण यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. तसेच, या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यापूर्वीही बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीकडून पोलीस चक्क मसाज करून घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर जिल्ह्यातून तडीपार झालेले आरोपी बार्शीत येऊन जुगार खेळत असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे बार्शी पोलीस सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याऐवजी आरोपीसाठी पायघड्या तर घालत नाही ना असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित बातम्या :

सरांचं विवाहित मॅडमवर एकतर्फी प्रेम, सनकी शिक्षकाचा चाकूहल्ला

कैद्यांचा घरगड्यासारखा वापर, रत्नागिरी जेलमधील धक्कादायक प्रकार

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना मुंबईतून अटक

छोटा राजनची आयडिया वापरली, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी पळाला?