मुख्यमंत्र्यांकडून प्लाझ्मा थेरपीच्या उपक्रमाचा शुभारंभ, 19 व्या शतकात वापरलेली प्लाझ्मा थेरपी नेमकी काय?

| Updated on: Jun 30, 2020 | 12:35 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्लाझ्मा थेरपीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात (CM Uddhav Thackeray launched Project Platina Plasma Therapy) आला.

मुख्यमंत्र्यांकडून प्लाझ्मा थेरपीच्या उपक्रमाचा शुभारंभ, 19 व्या शतकात वापरलेली प्लाझ्मा थेरपी नेमकी काय?
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (29 जून) वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (CM Uddhav Thackeray launched Project Platina Plasma Therapy) माध्यमातून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या ‘प्रोजेक्ट प्लॅटिना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. “एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्णाने www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा दान करावे,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो.

“महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात होणार आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयात या थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. या केंद्रांवर दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सर्व रूग्णांसाठी संपूर्ण प्लाझ्मा थेरपी उपचार मोफत असणार आहे. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रथमच उपयोग होत आहे. जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण महाराष्ट्र राज्यात सुरु करतो आहोत,” याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

प्लाझ्मा देणारे जीवनदाते

“एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले. ही काही नवीन गोष्ट शोधून काढलेली नाही. गेल्या 100 वर्षांपासून त्याचा उपयोग होतो आहे. आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरने अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. (CM Uddhav Thackeray launched Project Platina Plasma Therapy)

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

  • प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.
  • जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते. तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
  • हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
  • डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररित्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात. जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.
  • प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
  • प्लाझ्मा वेळत दिल्याने 10 पैकी 9 रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल.
  • महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवून प्लाझ्मा संकलित केले जाईल.  आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत.

19 व्या शतकात प्लाझ्मा थेरपीचा सर्वप्रथम प्रयोग

प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सर्वप्रथम 19 व्या शतकात एमिल व्होन बेहरिंग आणि तास्तो शिबासाबूरोव या दोन डॉक्टर्सनी करायचे ठरविले. डायपेथेरीया या जैविक आजारावर याचा प्रयोग करायचे ठरविले. त्याला यश मिळाले. तेव्हापासून अशा रीतीने पॅसिव्ह उपचार करणे सुरु झाले.

एमिल व्होन बेहरिंग यांना जैविक आणि विषाणूजन्य आजारांवर उपचार पद्धतीसाठी नोबेल पारितोषक देखील मिळाले आहे.

प्लाझ्मा थेरपीचा उपचार रुग्णांना बरे होण्यासाठी प्रभावीरीत्या होताना दिसतो, असे जॉन्स हॉपकिन्सच्या डॉक्टरांनी देखील सांगितले.

केंद्रीय टीमकडून महाराष्ट्राचे कौतुक

“दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय टीम येऊन गेली तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती.  पण आता परवाच ही टीम परत येऊन गेली. त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हे माझे एकट्याचे प्रयत्न नाही. महाराष्ट्र चिवट आहे, प्रयत्न आणि प्रयोग करणारा, धाडसी आहे. मी तुमच्या पाठीशी नाही तर सोबत आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray launched Project Platina Plasma Therapy)

संबंधित बातम्या :

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन