देशातील पहिली खाजगी ट्रेन 4 तारखेपासून रुळावर

| Updated on: Sep 16, 2019 | 11:23 PM

देशातील पहिली खाजगी 'तेजस एक्स्प्रेस' ट्रेन (Tejas Express Train) 4 ऑक्टोबरपासून धावणार आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे संचलित केली जाणार आहे.

देशातील पहिली खाजगी ट्रेन 4 तारखेपासून रुळावर
Follow us on

लखनऊ : देशातील पहिली खाजगी ‘तेजस एक्स्प्रेस’ ट्रेन (Tejas Express Train) 4 ऑक्टोबरपासून धावणार आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे संचलित केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanath) यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

सुरुवातीला ही तेजस एक्सप्रेस ट्रेन (Tejas Express Train) लखनऊ ते दिल्ली दरम्यान संचलित केली जाणार आहे. ट्रेन 6 तास 15 मिनिटात हा प्रवास पूर्ण करेल. लवकरच अशी ट्रेन मुंबई ते अहमदाबाद सुरु केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचे संचलन पूर्णपणे आयआरसीटीसीच्या हातात असेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील आणि पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीद्वारे ही ट्रेन चालवली जाणार आहे.

तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 25 लाख रुपयांचा विमा दिला जाईल. या ट्रेनच्या प्रवाशांना लखनऊ जंक्शनवर प्रतीक्षालय आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एग्जिक्यूटिव्ह लाऊंजची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय रेल्वे प्रवाशांचे सामान स्टेशन ते घर आणि घर ते स्टेशनपर्यंत पोहचविण्याची सुविधाही देणार आहे पण यासाठी वेगळे पैसे आकारले जाईल.

“प्रवाशांना पाण्याची बॉटल दिली जाईल. त्यासोबतच एका कोचमध्ये आरओची सुविधा असेल. यामध्ये बॉटल रीफिल केली जाऊ शकते. या ट्रेनमध्ये कोणतीही सूट अथवा पास लागू नसेल. पाच वर्षाच्या वरील मुलांसाठी तिकीट असेल. तसेच तात्काळ कोटाची सुविधा नसेल. तसेच परदेशी नागरिकांसाठी विशेष कोच उपलब्ध असेल”, असं आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

येत्या 4 ऑक्टोबरला या ट्रेनचे संचलन सुरु होणार असून नोव्हेंबरमध्ये मुंबई ते अहमदाबाद ट्रेन सुरु होणार आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याप्रकारे एअरपोर्ट चालवतात, त्याप्रकारे प्रायव्हेट कंपन्या ट्रेन चालवणार आहेत, अस रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.