पंढरपुरात मटण खाण्यासाठी कैदी पोलिसाच्या मदतीने घरी, जेलमधील 28 जणांना कोरोनाचा संसर्ग, 100 नातेवाईकही संपर्कात

| Updated on: Jul 23, 2020 | 3:57 PM

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला तानाजी भोसले नावाचा कैदी गुपचूप पोलिसांच्या मदतीने बंदोबस्तात मटण खाण्यासाठी घरी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला.

पंढरपुरात मटण खाण्यासाठी कैदी पोलिसाच्या मदतीने घरी, जेलमधील 28 जणांना कोरोनाचा संसर्ग, 100 नातेवाईकही संपर्कात
Follow us on

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात 17 जुलै रोजी म्हसोबाची जत्रा (Pandharpur Corona Virus Spread) होती. म्हसोबाला कापलेला बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी मंगळवेढाच्या सबजेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला तानाजी भोसले नावाचा कैदी गुपचूप पोलिसाच्या मदतीने बंदोबस्तात मटण खाण्यासाठी घरी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला. त्यानंतर या कैदीमुळे तुरुंगातील 28 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आणि सर्व प्रकार उघडकीस आला (Pandharpur Corona Virus Spread).

नेमकं प्रकरण काय?

पोलीस हवालदार माने यांनी मंगळवेढा सबजेलमधील कैदी तानाजी भोसले यांच्या पोटात दुखत असल्याने त्याला उपचारासाठी घेऊन गेल्याची नोंद केली. इथपर्यंत सर्व प्रकार बिनदिक्कत घडला. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तुरुंगातून स्वतःच्या घरी गेला आणि पोलीस बंदोबस्तात बोकडाच्या मटणावर यथेच्छ ताव मारला. याची कोणालाच खबर लागली नाही. पण, पुढे जे घडले ते उलटेच.

सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग मंगळवेढ्यातील सब जेलमध्येसुद्धा पोहोचला. या जेलमधील तब्बल 28 कैद्यांना कोरोना झाला आहे. या 28 कैद्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच जेलमध्ये खळबळ माजली (Pandharpur Corona Virus Spread).

या कोरोनाबाधित कैद्यांमध्ये तानाजी भोसले याचाही समावेश असल्याचे कळताच त्याच्या आंबे या गावातील नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली. त्याचवेळी तानाजी भोसले याच्या तुरुंगातून घरी जाण्याच्या पराक्रमाला वाचा फुटला.

आंबे गावातील नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण

त्यादिवशी बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी आंबे गावात हजर असलेल्या सर्व नातेवाईकांची मात्र आता बोबडी वळली आहे. तानाजीमुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल. या भीतीने त्यांची तारांबळ उडाली आहे. त्या जेवणाला जवळपास 100 पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. ही सर्व मंडळी कैदी तानाजी भोसले यांच्या संपर्कात आली होती.

इकडे सब जेलमधील कैदी बोकडाचे मटण खाण्यासाठी त्याच्या घरी गेलाच कसा, याचा शोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरु केला. मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्याकडे या प्रकरणाची माहिती घेतली असता सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असुन आज संध्याकाळपर्यंत याचा अहवाल येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pandharpur Corona Virus Spread

संबंधित बातम्या :

Panvel Rape | पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी

चोरट्यांनाही कोरोनाची धास्ती, पुण्यात मास्क लावून चोरी करणाऱ्या दोघांना अटक