सुप्रिया सुळेंचा पुढाकार, 45 दिवसांपासून आजोळी अडकलेल्या मायलेकरांची अखेर भेट

| Updated on: Apr 26, 2020 | 6:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मदतीने अखेर या मायलेकरांची भेट झाली आहे (Supriya Sule Help to meet mother to children).

सुप्रिया सुळेंचा पुढाकार, 45 दिवसांपासून आजोळी अडकलेल्या मायलेकरांची अखेर भेट
Follow us on

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांची आपल्या घराकडे परतण्यासाठी मोठी धडपड सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात देखील अशाच प्रकारे दोन मुलं मागील 45 दिवसांपासून आपल्या आजोळी अडकले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मदतीने अखेर या मायलेकरांची भेट झाली आहे (Supriya Sule Help to meet mother to children).

पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या सुरेखा आणि श्रीकांत तेली या दाम्पत्याची कियान आणि किमया अशी दोन मुले आहेत. हे दोघे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर या गावी आपल्या आजीकडे गेली होती. दोन्ही मुले तिकडे गेल्यानंतर कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. अवघा 6 वर्षांचा कियान आणि 9 वर्षांची ही मुले आज-उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती. मात्र, दिवसामागून दिवस सरु लागले तरी वाहतूक सुरु होईना. आधी 21 दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई-वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. इकडे आईचा जीवसुद्धा कासावीस झाला. मोबाईलवरुन एकमेकांशी संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेट घेऊन आईच्या कुशीत झेपावण्यासाठी मुलं अक्षरशः व्याकुळ झाली होती.

काही मार्गच दिसत नव्हता. त्यामुळे अखेर सुरेखा तेली यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले 45 दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही मुलांना पुण्यात आणण्याची परवानगी मिळाली. आवश्यक परवानग्या घेऊन कन्नड तालुक्यातून रवाना झालेली गाडी दोन्ही मुले घेऊन खराडी येथील तेली यांच्या घरी पोहोचली. दारात गाडी पोहोचताच मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यात अश्रू आणून सुरेखा तेली यांनी मुलांना कवटाळले आणि खासदार सुळे यांचे भरभरुन आभार मानले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, 10 हजार 500 कोटींचा हप्ता थांबवण्याचीही मागणी

Corona : पुण्यातील बहुसंख्य कोरोना रुग्ण दाट लोकवस्तीतील, एकेका घरात आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह

उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होणार का? शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणतात…

वाधवान बंधूंना सीबीआयकडून अटक, महाबळेश्वरमध्ये जाऊन कारवाई

Supriya Sule Help to meet mother to children