पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
जरी डुकराचे मूत्रपिंड हा दीर्घकालीन उपाय नसला, तरीही दुसरा मानवी किडनीच्या प्रत्यारोपणाचा पर्याय मिळेपर्यंत रुग्णाला डायलिसिसपासून दूर ठेवण्यास डुकराच्या विकसित किडनीची मदत होऊ शकणार आहे.

जनुकीयदृष्ट्या सुधारित केलेल्या डुकराच्या किडनीद्वारे नऊ महिने जगण्याचा विक्रम टिम अँड्र्यूज यांच्या नावावर जमा झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्यावर अखेर मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. मार्च २०२४ मध्ये एफडीए-मान्यताप्राप्त कार्यक्रमांतर्गत जनुकीयदृष्ट्या सुधारित डुकराचे मूत्रपिंडाचे रोपण झालेल्यात पाच रुग्णांपैकी टिम अँड्र्यूज हे ६६ वर्षीय रुग्ण आहेत.
हे महत्वाचे संशोधन ईजेनेसिस (eGenesis) या अमेरिकन बायोटेक कंपनीने केले आहे. जी प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या अवयवयांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी मानवी सुसंगत जनुकीय अवयव विकसित करते. कंपनीने म्हटले आहे की अँड्र्यूज यांनी एक नवीन जागतिक विक्रम केला आहे. त्यांची केस आता ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झाली आहे.
“या रुग्णांच्या उदाहरणामधून महत्त्वाचा पुरावा मिळतो की जनुकीयदृष्ट्या सुधारित अवयव मूत्रपिंडाचे कार्य दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतात आणि डायलिसिसपासून स्वातंत्र्य देऊ शकतात, तसेच त्यानंतरच्या मानवी प्रत्यारोपणाची संधीही कायम ठेवू शकतात, असे ईजेनेसिसचे सीईओ माईक कर्टिस यांनी म्हटले आहे.
डुकराची किडनी ठरली आशेचा किरण
‘मास जनरल ब्रिघम’ ( Mass General Brigham ) च्या मदतीने विकसित केलेल्या ‘EGEN-2784’ या जनुकीयदृष्ट्या सुधारित ( genetically engineered ) डुकराच्या मूत्रपिंडाबाबतच्या ( kidney ) सुरू असलेल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून ‘ई-जेनेसिस’ ने ( eGenesis ) ही माहिती दिली आहे.
जगभरातील लाखो लोक ‘एंड-स्टेज किडनी डिसीज’ने (मूत्रपिंड निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यातील आजार) ग्रस्त आहेत, ज्यावर अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय आहे. परंतु, अवयव दान करणाऱ्यांची (donors) तीव्र कमतरता असल्याने, रुग्णांना प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतिक्षा यादीत तिष्ठत रहावे लागते.तसेच अनेक महिने डायलिसिसवर अवलंबून राहावे लागते. २०२४ मध्ये अमेरिकेत केवळ २८,००० मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, जनुकीयदृष्ट्या सुधारित डुकराची मूत्रपिंडे एक आशादायक उपाय ठरू शकतात.
“मानवी दात्यांच्या अवयवांच्या टंचाईमुळे येणाऱ्या अडचणींशिवाय, रुग्णांना गरज असेल तेव्हा प्रत्यारोपण उपलब्ध करून देणे हे आपले ध्येय आहे. EGEN-2784 ला ‘फेज १/२/३ RESTORE’ अभ्यासाच्या पुढील टप्प्यावर नेण्याची तयारी करत असताना, या अनुभवांमधून आम्हाला महत्त्वपूर्ण वैद्यकीय पुरावे मिळत आहेत,” ईजेनेसिसचे सीईओ माईक कर्टिस यांनी म्हटले आहे.