ठाकरे सरकारची सेंच्युरी, शंभर दिवसातले महत्त्वाचे 20 निर्णय

| Updated on: Mar 06, 2020 | 9:10 AM

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा 'टीव्ही9 मराठी'कडून संक्षिप्त आढावा Thackeray Government Important Decisions

ठाकरे सरकारची सेंच्युरी, शंभर दिवसातले महत्त्वाचे 20 निर्णय
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चं अभूतपूर्व सरकार स्थापन झालं आणि बघता बघता शंभर दिवसही पूर्ण झाले. 28 नोव्हेंबर 2019 च्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाची धुरा वाहणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या समन्वयाने सरकारने ‘सेंच्युरी’ ठोकली आहे. (Thackeray Government Important Decisions)

‘परस्पर विरोधी विचारांची तीनचाकी रिक्षा’ अशा शब्दात विरोधीपक्षाने हिणवल्यानंतरही संवादाच्या वंगणावर ठाकरे सरकारने शंभर किलोमीटर अंतर पार केलं आहे. ‘स्थगिती सरकार’ अशी टीका होऊनही ही रिक्षा विनाब्रेक धावत आहे. राज्यात ‘कोरोना व्हायरस’चं वादळ घोंघावत असताना सरकारची दोन हात करण्याची तयारी दिसत आहे.

संसदीय राजकारणात नवख्या असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय या प्रवासात मैलाचे दगड ठरत आहेत. या निर्णयांचा ‘टीव्ही9 मराठी’कडून संक्षिप्त आढावा

महाविकास आघाडी सरकारचे महत्त्वाचे 20 निर्णय (Thackeray Government Important Decisions)

1. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 10 हजार कोटी देण्यास मान्यता
2. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी गरजूंना दहा रुपयात शिवभोजन योजनेस प्रारंभ
3. ‘मुंबई 24 तास’ संकल्पनेची घोषणा आणि अंमलबजावणी
4. राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू
5. नगर परिषद क्षेत्राचा विकास करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती
अवलंब
6. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार
7. महाराष्ट्रातील सर्वभाषिक शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य
8. रेडिरेकनरच्या दरात व्यावहारिकता आणून महसूल वाढ करणार
9. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन कॅबिनेट मंत्री समन्वय ठेवणार
10. एसटी महामंडळाच्या दोन हजार नवीन बसेससाठी 600 कोटींचा प्रस्ताव
11. सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनांच्या तांत्रिक तपासणीसाठी ऑटो डीसीआर प्रणाली
12. रायगड जतन-संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांचा निधी
13. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यापुढे ‘बहुजन कल्याण विभाग’ म्हणून ओळखला जाणार
14. दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार
15. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी ‘दिशा’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्याची घोषणा, 138 जलदगती न्यायालये
16. मराठवाडा विभागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 1300 कोटींचा निधी, शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ची संकल्पना राबवणार, दृष्टीदोष असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार
17. महापरीक्षा पोर्टल बंद, लेखी परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया
18. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या 4 हजार 500 पदांची भरती करणार
19. मराठीतील वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यात ‘मिनी चित्रपटगृह’ उभारणार
20. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ 1 मेपर्यंत कार्यान्वित करणार

ठाकरे सरकारचा सर्वात ताजा निर्णय : औरंगाबाद विमानतळाचं नाव बदललं

Thackeray Government Important Decisions