Lockdown Effect | भारतात डिसेंबरपर्यंत सर्वाधिक 2 कोटी बाळांचा जन्म, UNICEF चा अंदाज

| Updated on: May 08, 2020 | 5:23 PM

भारतात यावर्षी मार्च ते डिसेंबर या काळात सर्वाधिक 2 कोटी मुलांचा जन्म होईल, असा अंदाज युनिसेफने वर्तवला आहे (UNICEF on child birth in India amid corona)

Lockdown Effect | भारतात डिसेंबरपर्यंत सर्वाधिक 2 कोटी बाळांचा जन्म, UNICEF चा अंदाज
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !
Follow us on

नवी दिल्ली : भारतात यावर्षी मार्च ते डिसेंबर या काळात सर्वाधिक 2 कोटी मुलांचा जन्म होईल, असा अंदाज युनिसेफने वर्तवला आहे (UNICEF on child birth in India amid corona). 11 मार्च ते 16 डिसेंबर दरम्यान, जगभरात एकूण 11 कोटी 60 लाख मुलांचा जन्म होईल. यापैकी एकट्या भारतामध्ये 2.1 कोटी, चीनमध्ये 1.35 कोटी मुलांचा जन्म होईल, असंही युनिसेफने नमूद केलं आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे बाळाला जन्म देणाऱ्या आई आणि त्या बाळाला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागेल, असाही इशारा युनिसेफने दिला.

या व्यतिरिक्त नायजेरियामध्ये 60.4 लाख, पाकिस्तानमध्ये 50 लाख आणि इंडोनेशियामध्ये 40 लाख मुलांचा जन्म होईल असा अंदाज आहे. नवजात मुलांच्या जन्माच्या यादीत अमेरिका सहाव्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत या काळात जवळपास 30 लाख मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे. युनिसेफने संयुक्त राष्ट्राच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन डिव्हिजन 2019 च्या अहवालातील माहितीनुसार हा अंदाज लावला आहे. सामान्यपणे बाळाचा गर्भ आईच्या पोटात जवळपास 9 महिने किंवा 40 आठवड्यांपर्यंत राहतो. याच निकषाचा वापर करुन युनिसेफने मुलांच्या जन्माच्या आकडीवारीचा अंदाज वर्तवला आहे.

युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या, “आगामी काळात नव्याने आई होणाऱ्या महिलांना आणि नवजात बाळांना कठीण वास्तवाचा सामना करावा लागणार आहे. कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात कर्फ्यू आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा स्थितीत आवश्यक औषधे आणि उपकरणांचा अभाव, एएनएम आणि हेल्थ वर्करची कमतरता यामुळे गरोदर महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक महिला देखील दवाखान्यांमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे आरोग्य सेवांवर परिणाम होणार

युनिसेफने आपल्या जागतिक अहवालात म्हटलं आहे, की कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन सारख्या उपाय योजनांचा जीवनावश्यक आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे. यामुळे नवजात बाळ आणि आई दोघांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विकसशील देशांमध्ये हा धोका सर्वाधिक आहे. या देशांमध्ये कोरोनाची स्थिती तयार होण्याच्या आधीपासून नवजात बाळांच्या मृत्यूचा दर अधिक आहे. त्यामुळे कोरोनामुळे तयार झालेल्या स्थितीत हा धोका अधिक वाढेल.

दरवर्षी 28 लाख गर्भवती महिलांचा आणि नवजात बाळांचा मृत्यू

कोविड-19 महामारी येण्याआधी जगभरात दरवर्षी जवळपास 28 लाख गर्भवती महिला आणि नवजात बाळांचा मृत्यू होत होता. प्रत्येक सेकंदाला 11 मृत्यू होत होते. अशास्थितीत युनिसेफने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची आणि औषधांची व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. यामुळे गर्भावस्थेत महिलांचा आणि बाळाचा जीव वाचवता येईल, असं युनिसेफने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना विषाणूवर लस तयार, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

जगात काय घडतंय? : लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख महिला गर्भवती होतील : यूएन

UNICEF on child birth in India amid corona