Budget 2019 : एक्साईज ड्युटी वाढली, पेट्रोल 1 नाही, अडीच रुपयांनी महागणार

| Updated on: Jul 05, 2019 | 10:54 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकार 2.0 चा आर्थिक वर्ष 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्री सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवणार असल्याचं सांगितलं. अतिरिक्त कर लावल्यानंतर पेट्रोल 2.5 रुपये आणि डिझेल 2.3 रुपये प्रति लीटरने महागणार आहे.

Budget 2019 : एक्साईज ड्युटी वाढली, पेट्रोल 1 नाही, अडीच रुपयांनी महागणार
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकार 2.0 चा आर्थिक वर्ष 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्री सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवणार असल्याचं सांगितलं. पेट्रोल-डिझेलवर दोन रुपये एक्साईज ड्युटी आणि अतिरिक्त सेस लावण्यात आला आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेल महागणार आहे. हा अतिरिक्त कर लावल्यानंतर पेट्रोल 2.5 रुपये आणि डिझेल 2.3 रुपये प्रति लीटरने महागणार आहे. यामुळे सरकारच्या उत्पन्नात 28,000 कोटी रुपयांची वाढ होईल.

इंधनाच्या मूळ किमतीवर केंद्राची एक्साईज ड्युटी आणि सेस लागल्यानंतर VAT लागतो. यामुळे पेट्रोलच्या दरात 2.5 आणि डिझेलच्या दरात 2.3 रुपये प्रति लीटरने वाढ होणार आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.51 रुपये, तर मुंबईत 76.15 रुपये होती. तसेच, डिझेलची किंमत दिल्लीमध्ये 64.33 रुपये आणि मुंबईत 67.40 रुपये प्रति लीटर होती.

या व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी कच्च्या तेलाच्या आयातीवरही एक रुपया प्रति टनच्या हिशोबाने आयात शुल्क लावले आहे. भारत वर्षभरात 22 कोटी टन कच्च्यातेलाची आयात करतो. कच्च्या तेलाच्या आयातीवरही आयात शुल्क लावल्याने सरकारला जवळपास 22 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

सध्याच्या स्थितीत सरकार कच्च्या तेलावर कुठल्याही प्रकारची कस्टम ड्युटी आकारत नाही. यावर प्रति टन NCCD (नॅशनल कॅलेमिटी कॉन्टिनेंट ड्युटी) लावली जाते.

“कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सेस आणि एक्साईज ड्युटीचं पुनरावलोकन केलं जाऊ शकतं. पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर दोन रुपयांप्रमाणे एक्साईज ड्युटी आणि सेस वाढवला जाईल”, असं निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं.

सध्याच्या स्थितीत पेट्रोलवर प्रति लीटर एकूण 17.98 रुपयांची एक्साईज ड्युटी लावली जाते. तर डिझेलवर प्रति लीटर एकूण 13.83 रुपयांची एक्साईज ड्युटी लागते. त्याशिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे VAT ही लागतात. दिल्लीमध्ये 27 टक्के VAT लागतो, तर मुंबईत 26 टक्के VAT आणि 7.12 रुपये अतिरिक्त कर लागतो.

कंपन्यांनी शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये स्थिरता कायम ठेवली. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये शुक्रवारीही पेट्रोलचे दर क्रमश: 70.51 रुपये, 72.75 रुपये, 76.15 रुपये आणि 73.19 रुपये प्रति लीटर होते. या चारही महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 64.33 रुपये, 66.23 रुपये, 67.40 रुपये आणि 67.96 रुपये प्रति लीटर होते.

संबंधित बातम्या :

अर्थसंकल्पामुळे तुमच्या आयुष्यात या 10 गोष्टी बदलणार

5 ट्रिलियन डॉलरसाठी संघर्ष, जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा कितवा क्रमांक?

Budget 2019: अर्थसंकल्पात कुणाला किती कर सवलत?

घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, अर्थसंकल्पात काय महाग, काय स्वस्त?