डाळिंबाच्या साली फेकून देताय? चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी असा करा वापर!
Pomegranate Peel : डाळिंब सोलल्यानंतर त्याची साल फेकून देता का? थांबा, तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. स्किन केअरमध्ये डाळिंबाची साल कशी वापरावी हे जाणून घ्या.

वाढते वय, धूळ, प्रदूषण आणि धावपळीची जीवनशैली यांचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. विशेषतः वयाच्या ३० वर्षांनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. चेहऱ्यावरील काळे डाग, निस्तेजपणा आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेक महिला महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र, त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमीच महागडी उत्पादने खरेदी करण्याची गरज नसते. काही घरगुती उपायांचाही पर्याय निवडता येतो. डाळिंब हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर फळ नाही, तर त्याच्या सालीचा देखील त्वचेसाठी वापर करता येतो. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्याची पावडर तयार करून फेस पॅक किंवा स्क्रबमध्ये वापरता येते.
अशी बनवा डाळिंबाच्या सालीची पावडर
डाळिंबाच्या सालीचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम त्या स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर चाळणीत ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे निथळू द्या. आता साली एका स्वच्छ सुती कापडावर पसरवून उन्हात किंवा हवेशीर जागेत वाळवा. साली चांगल्या वाळल्यानंतर त्या कडक होतील. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात साठवून ठेवा. फेस पॅक तयार करताना आवश्यकतेनुसार या पावडरचा वापर करता येतो.
दह्यामध्ये मिसळून लावा
तयार केलेली डाळिंबाच्या सालीची एक चमचा पावडर घ्या आणि आणि दीड चमचा दहीमध्ये मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून साधारण १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवा. दह्यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते.
ओट्ससोबत करा वापर
चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी ओट्ससोबत डाळिंबाच्या सालीची पावडर वापरता येते. यासाठी ओट्सची पावडर, डाळिंबाच्या सालीची पावडर, थोडे मध आणि दूध एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने स्क्रब करा. त्वचेवर जोरात घासणे टाळा, कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
गुलाब पाण्यासोबत बनवा फेस पॅक
डाळिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर लावून काही मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुऊन टाका.
टीप: चेहऱ्यावर कोणताही नवीन पदार्थ वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूला थोडासा लावून पॅच टेस्ट करा. लालसरपणा, खाज किंवा जळजळ झाल्यास वापर टाळा.