दिवसभर उत्साही राहण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ 4 उच्च प्रोटीनयुक्त स्मूदी
तुम्ही जर तुमच्या शरीराला भरपूर प्रथिने आणि ऊर्जा देऊ इच्छित असाल तर हे चार घरगुती उच्च-प्रथिनयुक्त स्मूदी उत्तम पर्याय ठरू शकतात. चला तर मग हे स्मूदी घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करू शकता ते जाणून घेऊयात.

आपल्यापैकी बरेचजण त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः जे जिममध्ये जातात, व्यायाम करतात आणि फिटनेसबाबत खूपच जागरूक असतात, ते त्यांच्या आहारात उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करतात. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी तसेच स्नायूंचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि जास्त वेळ सक्रिय राहण्यासाठी प्रथिने आवश्यक मानली जातात. याकरिता उच्च-प्रथिनयुक्त स्मूदी हा एक सोपा चविष्ट आणि झटपट पर्याय आहे. जो घरी फक्त काही मिनिटांत तयार करता येतो.
उच्च-प्रथिनयुक्त स्मूदीमधून तुमच्या शरीराला प्रथिने, फायबर , जीवनसत्त्वे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. याचे सेवन नाश्त्यासाठी, व्यायामानंतर किंवा संध्याकाळचा आरोग्यदायी नाश्ता म्हणून केले जाऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण घरच्या घरी बनवता येणारे स्मूदींची रेसिपी तसेच ते बनवताना कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊयात.
केळी आणि पीनट बटर स्मूदी
केळी आणि पीनट बटर स्मूदी बनवण्यासाठी एक केळे, एक ग्लास दूध, एक चमचा पीनट बटर आणि थोडे ओट्स एकत्र ब्लेंड करा. हवे असल्यास त्यात बर्फाचे काही तुकडे टाका. ही स्मूदी प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी फॅट्सने समृद्ध आहे. केळी आणि पीनट बटर स्मूदी प्यायल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते.
ओट्स आणि दही स्मूदी
एका वाटीत दही, 3 ते 4 मोठे चमचे ओट्स, एक केळे आणि थोडा सुका मेवा एकत्र करून ब्लेंड करा. ही स्मूदी प्रथिने, फायबर आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. नाश्त्यामध्ये ही स्मूदी प्यायल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.
सोया दूध आणि चिया बियांची स्मूदी
एक ग्लास सोया दुधात एक चमचा चिया सीड्स, एक केळे आणि थोडे मध मिक्स करून ब्लेंड करा. ही स्मूदी प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबरने समृद्ध आहे. शाकाहारी लोकांसाठीही हा एक चांगला पर्याय असून, यामुळे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळण्यास मदत होते.
पनीर आणि बेरी स्मूदी
थोडे पनीर, एक कप बेरी, एक ग्लास दूध आणि थोडे मध एकत्र करून मिश्रण ब्लेंड करा. ही स्मूदी प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. व्यायामानंतर किंवा नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि यामुळे स्नायूंचे आरोग्यही सुधारते.
स्मूदी बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
स्मूदी बनवताना ताजी फळे आणि चांगल्या प्रतीचे पदार्थ वापरा. त्यात अतिरिक्त साखर किंवा गोड सिरप टाकणे टाळा. जर फळे आधीच गोड असतील, तर त्यात अतिरिक्त साखर मिक्स करण्याची गरज नाही. स्मूदी अधिक संतुलित बनवण्यासाठी त्यात प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी फॅट्सचा समावेश करा.
तुमचे वय, आरोग्य आणि गरजा लक्षात घेऊन स्मूदी निवडा. तुम्हाला ॲलर्जी किंवा आरोग्याच्या समस्या असल्यास, स्मूदी घेणे टाळा आणि आवश्यक असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)