राज्यातील शाळांना १३ दिवसांची दिवाळी सुट्टी, १६ नोव्हेंबरपासून दूसरे सत्र
दिवाळी सुटीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आगामी सणांचे औचित्य साधून आपल्या कौटुंबिक प्रवासाचे आणि सुट्ट्यांचे पूर्वनियोजन करणे आता सोपे होणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीनिमित्त २ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत १३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने याबाबतचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर सोमवार, दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळांमध्ये नियमित वर्ग पूर्ववत सुरू होतील आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सत्राला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १५ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होत असून दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत चालणार आहे असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.त्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या काळात विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे उन्हाळी सुट्टी लागू राहील. यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा तसेच ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज हे मुख्य सण येत आहेत.
दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात परस्पर अथवा स्वेच्छेने कोणताही बदल करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. स्थानिक पातळीवरील सण अथवा अपरिहार्य कारणास्तव तारखांमध्ये फेरबदल करावयाचा असल्यास संबंधित शाळांना शिक्षण विभागाची रीतसर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन शासनाकडून वेळेत जाहीर झाल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आगामी दिवाळी सणांचे औचित्य साधून आपल्या कौटुंबिक प्रवासाचे आणि सुट्ट्यांचे पूर्वनियोजन करणे आता सोपे झाले आहे.