सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली : अजितदादा

| Updated on: Jan 17, 2021 | 2:39 PM

बेळगावसह सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली : अजितदादा
Ajit Pawar
Follow us on

मुंबई : बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. (Ajit Pawar Says will fight till the last Marathi village in the border area added in Maharashtra)

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “1956 मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील”.

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद झाले, तर 250 हून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांचे बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन

दरम्यान, सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, “बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान आहे. बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”.

शिंदे यावेळी म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीमा लढ्यात तुरुंगवास भोगल्याने माझा आणि सहकारी सीमा भाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांचं या लढ्याशी भावनिक नातं आहे. आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही”.

संबंधित बातम्या

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले

काम करू की सत्कार स्वीकारू?; अजित पवार भडकले!

(Ajit Pawar Says will fight till the last Marathi village in the border area added in Maharashtra)