अमित शाह यांचं अकोल्यात SC, ST आणि OBC आरक्षणावर सर्वात मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 23, 2024 | 6:41 PM

"अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या सर्व बंधूंवर अत्याचार झाले. महिला, मुलींवर बलात्कार करण्यात आला. त्यांना सुरक्षा द्यायची की नाही? ते भारताच्या शरणात आले. मोदी सरकारने हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या शरणार्थी बंधूंना नागरिकता देण्याचं काम केलं", असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांचं अकोल्यात SC, ST आणि OBC आरक्षणावर सर्वात मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Follow us on

अकोल्याचे महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अकोल्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसकडून चुकीचा प्रचार केला जातोय. भाजप संविधान बदलणार नाही. तसेच SC, ST आणि OBC आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही, असं अमित शाह म्हणाले. “जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कुणीही हटवू शकत नाही. ही मोदींची गॅरंटी आहे”, असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले. अमित शाह यांनी यावेळी कलम 370 वरुनही काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी अमित शाह यांनी अकोल्याच्या नागरिकांना महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच भाजपकडून काय-काय कामे करण्यात आली, याबाबतची माहिती अमित शाह यांनी आपल्या भाषणातून दिली.

“ट्रिपल तलाक हटवलं पाहिजे की नको? पण काँग्रेस पक्ष म्हणतो, ते वापस आले तर ट्रिपल तलाक घेऊन येणार. मी आज अकोल्यावाल्यांना सांगू इच्छितो, ना काँग्रेसला येऊ देणार, ना ट्रिपल तलाकला येऊ देणार. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या सर्व बंधूंवर अत्याचार झाले. महिला, मुलींवर बलात्कार करण्यात आला. त्यांना सुरक्षा द्यायची की नाही? ते भारताच्या शरणात आले. मोदी सरकारने हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या शरणार्थी बंधूंना नागरिकता देण्याचं काम केलं. काँग्रेस म्हणतं आम्ही सीएए रद्द करना. जोपर्यंत भाजपचा एक छोटा मुलगाही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सीएएला हात लाऊ देणार नाही”, असं अमित शाह म्हणाले.

‘तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण…’

“काँग्रेस पक्ष खोटं पसरवत आहे की, भाजपला 400 जागांवर विजय मिळाला तर आरक्षण चाललं जाईल. अरे काँग्रेसवाल्यांनो, आम्हाला संविधान बदलण्याची ताकद या देशाच्या जनतेने 10 वर्षांपासून दिली आहे. जनतेने 2014 मध्ये पूर्ण बहुमत दिलं, 2019 मध्ये देखील दिलं. आम्ही आरक्षण हटवलं नाही. आम्ही काय हटवलं? आम्ही पूर्ण बहुमताचा उपयोग तीन तलाक हटवण्यासाठी केलं, कलम 370 हटवण्यासाठी केलं, दहशतवाद संपविण्यासाठी केलं आणि सीएए आणण्यासाठी केलं. अकोल्याच्या नागरिकांना मी आज मोदीजींची गॅरंटी म्हणून सांगून जातो, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कुणीही हटवू शकत नाही. ही मोदींची गॅरंटी आहे”, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.

“पूर्ण विदर्भात आणि सिंचन परियोजनांमध्ये नरेंद्र मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने भरपूर काम केलं आहे. भाजप विदर्भात पाण्याच्या योजनांसाठी कटिबद्ध आहे. जवळपाल 79 हजार कोटी रुपयांची वैनगंगा-नलगंगा इंटरलिंकिंग योजनेला आम्ही मंजुरी दिली आहे, ज्यामुळे अकोल्याचा दुष्काळ कायमचा समाप्त होईल. या योजनेमुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांची जवळपास 4 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हे भाजपने केलं आहे. आमच्या सरकारने अकोल्यात ई बस चालू केली. सामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 50 टक्के निधी राज्य सरकारने घेऊन रस्ता चालू केला. 160 कोटींचं विदर्भ-मराठवाडा डेअरी प्रोजेक्ट टाकलं”, अशा विविध कामांची अमित शाह यांनी माहिती दिली.