180 मुली, 350 पेक्षा जास्त व्हिडीओ अन् असंख्य… महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

अमरावतीत व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी १८० पीडित मुलींचा दावा केला असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे.

180 मुली, 350 पेक्षा जास्त व्हिडीओ अन् असंख्य... महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
viral video 1
| Updated on: Apr 14, 2026 | 7:45 AM

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर अनेक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सुमारे ३५० हून अधिक व्हिडीओ आणि असंख्य आक्षेपार्ह फोटोंमुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचा भंग करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी टोळीविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी आता केली जात आहे.

नेमके काय घडले?

गेल्या तीन दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर काही आक्षेपार्ह व्हिडीओ सातत्याने फिरत आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अयान आणि मोहम्मद जोयान या नावाच्या संशयितांनी तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून, तसेच काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने अश्लील कृत्ये करायला लावली. त्यानंतर, हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पीडितांना ब्लॅकमेल करण्याचे काम ही टोळी करत होती.

१८० मुली पीडित असल्याचा खळबळजनक दावा

राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये सुमारे १८० मुली अडकल्या असण्याची शक्यता आहे, ज्यापैकी बहुतांश अल्पवयीन आहेत. हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, हे एक मोठे षडयंत्र आहे. पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळायला हव्या,” अशी आक्रमक भूमिका अनिल बोंडे यांनी मांडली.

अमरावती ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधिकारी विशाल आनंद सिंगुरी यांनी सांगितले की, जरी अद्याप कोणीही पीडित पुढे येऊन तक्रार नोंदवत नसले, तरी सायबर सेलच्या माध्यमातून पुराव्यांचे संकलन सुरू करण्यात आले आहे. तसेच व्हायरल झालेले व्हिडिओ सायबर पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तसेच गरज पडल्यास महिला पोलीस अधिकारी त्यांचे जबाब नोंदवतील, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

याप्रकरणी हिंदू संघटना आणि संतप्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींना अटक झाली नाही, तर प्रशासन आणि पोलिसांविरुद्ध तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी आपल्या कुटुंबासह फरार झाल्याची माहिती समोर आल्याने पोलीस पथकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांत शोधमोहीम तीव्र केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिक आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. अशा गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. तसेच सत्य उघडकीस आणण्यासाठी सर्व तांत्रिक बाजू तपासल्या जात आहेत.

Follow Us