सीसीटीव्ही पाहिला आणि धक्काच बसला… मध्यरात्री जे घडलं त्याने शहारेही घाबरल्या; काय केली मागणी?

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरी मध्यरात्री 9-10 सशस्त्र संशयितांनी धाडसी शिरकाव केला. 90 मिनिटे चाललेला हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही पाहिला आणि धक्काच बसला... मध्यरात्री जे घडलं त्याने शहारेही घाबरल्या; काय केली मागणी?
Robbery
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 25, 2026 | 4:15 PM

गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरात उशिरा रात्री घडलेल्या एका संशयास्पद घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. देवरी नगर पंचायत प्रभाग क्रमांक 15 मधील चिचगड रोड परिसरात जिल्हा परिषद सदस्या तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या उषा शहारे यांच्या निवासस्थानी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास 9 ते 10 संशयित युवक शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकांच्या हातात शस्त्र होती. हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने शहारे घाबरल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

कारमधून आलेल्या या आरोपींनी उषा शहारे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश केला. संशयितांच्या हातात काही शस्त्र असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. तब्बल 90 मिनिटे हे युवक घराच्या परिसरात वावरत होते. घरातील एका वृद्ध महिलेच्या आरडाओरडीमुळे घाबरलेल्या संशयितांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

रात्री 2 वाजता…

याबाबत उषा शहारे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सकाळी घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसत होत्या. झाडांच्या कुंड्या पडलेल्या होत्या. सॅनिटायझर, कपडे आणि इतर साहित्य विखुरलेले होते. त्यानंतर सासूबाईंनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास काही लोक घरात शिरल्याचे सांगितले. घराच्या मीटरची ग्रीप काढण्यात आली होती. आमच्या घरात इन्व्हर्टर असल्यामुळे सुरुवातीला काही लक्षात आले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर धक्का बसला. सीसीटीव्हीत काही जण सशस्त्र अवस्थेत घराच्या दिशेने येताना दिसत आहेत. आम्ही तत्काळ देवरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, असं उषा शहारे म्हणाल्या.

माझं कुणाशी वैर नाही

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे देवरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी जनप्रतिनिधी म्हणून काम करते. माझे कोणाशी वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे हे चोरीसाठी आले होते की जीवितहानी करण्याच्या उद्देशाने आले होते, याचा तपास पोलिसांनी लवकर करावा. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी माझी मागणी आहे, असंही शहारे म्हणाल्या.

लोक धास्तावले

देवरीतील या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. आता पोलिसांच्या तपासातून नेमका या घटनेमागचा उद्देश काय होता, हे स्पष्ट होणार आहे.

Follow Us