आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
Asha Bhosale Health Update : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अशातच आता त्यांच्या कुटुंबीयांकडून आशा भोसले यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जनाई भोसलेंनी दिली तब्ब्येतीची अपडेट
आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर माहिती देताना म्हटले की, ‘माझी आजी, आशा भोसले यांना थकवा आणि छातीत संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा ही विनंती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. आम्ही लवकरच सकारात्मक अपडेट देऊ.’
चाहत्यांकडून प्रार्थना
भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन आशा भोसले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली आहे. आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजताच त्यांच्या चाहत्यांकडून त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच त्याचे कुटुंबीयही त्यांची काळजी घेत आहेत. त्या लवकरात कवकर बऱ्या होतील अशी सर्वांना आशा आहे.
16000 गाणी गायली
आशा भोसले यांनी 1948 साली कारकिर्दीची सुरुवात केली, चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे त्यांचे पहिले गाणे होते. आतापर्यंत त्यांनी सुमारे 16000 गाणी गायली आहेत. यात हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन अशा भाषांमधील गाण्याचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यासह जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे.
आर डी बर्मन यांच्याशी लग्न
आशा भोसले यांनी बॉलीवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतःही संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होते आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आशा भोसले यांनीही 2200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. त्यांना 2008 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान आपल्या नावावर केलेले आहेत.