Latur : जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन महायुतीत तणाव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारमंत्र्यांची काँग्रेससोबत हातमिळवणी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन महायुतीत तणाव निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारमंत्र्यांची काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने भाजप नारज झाला आहे.

लातूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे महायुतीत तणाव वाढला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने भाजपची नाराजी ओढावून घेतली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नाराज झाले आहेत. महायुतीत असताना थेट काँग्रेससोबत आघाडी मान्य नसल्याचे भाजपचं म्हणणं आहे. भाजपच्या नाराजीमुळे लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. आता या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख या दोघांनीही काल एकाच गाडीतून प्रवास केला. त्यानंतर दोघे काल लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानतंर बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचे चुलत बंधू अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासाची राज्यभरात चर्चा झाली. कारमधील प्रवासानंतर, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र होतो आणि आताही एकत्र आहोत, अशी भूमिका मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केली. या निवडणुकीबाबत खासदार सुनील तटकरे यांनी काल भूमिका स्पष्ट केली होती.
बाबासाहेब पाटील यांच्या निर्णयाविरोधात भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे नापसंती व्यक्ती केल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री पाटील यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गट काँग्रेससोबत आहे. तर दुसरा गटाचा महायुतीला पाठिंबा आहे. बाबासाहेब पाटील हे महायुतीविरोधात काम करत असल्याचा आरोप भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजप नेत्यांनी केला आहे.
बाबासाहेब पाटील यांचं म्हणणं काय?
बाबासाहेब पाटील यांचं म्हणणं आहे की, गेली 40 वर्ष जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही एकत्रित लढत आहोत. त्यामुळे विविध स्तरातील विकासाच्या मुद्द्यावर आता देखील ही निवडणूक एकत्र लढत आहोत’. तर लातूर जिल्हा बँकेची निवडणूक ही महायुतीचे नेते विरुद्ध काँग्रेस अशी दिसत असताना अचानकपणे शुक्रवारी मंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी एकाच गाडीतून प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि तिथे आपल्या समर्थक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध काँग्रेस अशी दिसत असलेली लातूर जिल्हा बँकेची निवडणूक आता दोन पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.