1 लाख 20 हजारात तान्हुल्या बाळाचा साैदा, चक्क जन्मदात्या आईनेच 1 महिन्याच्या..
छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना पुढे येत आहे. आपल्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री जन्म देणाऱ्या आईनेच केली. 1 महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजार रुपयांत बेकायदेशीर विक्री जन्म देणाऱ्या आईनेच केली.

अवघ्या 1 महिन्याच्या चिमुरड्याचा 1 लाख 20 हजार रुपयांत सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील संजयनगरमध्ये उघडकीस आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या या निष्पाप बाळाची जन्मदात्या आईनेच विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी जन्मदात्या आईसह बाळाच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या चौघांना अटक केली आहे. बाळाची 36 वर्षीय आई गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने तिच्या पहिल्या मुलीला सोडले आणि गेल्या तीन वर्षांपासून 34 वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. संबंधित प्रियकरही पत्नी आणि मुलाला सोडून तिच्यासोबत राहत होता. तो दारूच्या आहारी गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान 5 जुलै रोजी 36 वर्षीय महिलेने घाटी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. उपचारासाठी घाटी रुग्णालयात असतानाच तिची ओळख संजयनगर येथील स्वयंपाकाचे काम करणाऱ्या 65 वर्षीय कौशल्या बारकू पवार यांच्याशी झाली. कौशल्या पवार यांनी महिलेच्या कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेत तुझा नवरा दारू पितो, तो तुझा आणि बाळाचा सांभाळ कसा करणार?’ असा संशय तिच्या मनात निर्माण केला.
त्यानंतर सीमा अनिल रेशवाल वय 33 बाळ विकत घेते. ते बाळ मला दे, आम्ही त्याचा नीट सांभाळ करू, असे सांगून कौशल्या पवार यांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराला बाळ विक्रीसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजार रुपयांत बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर सरकारतर्फे फिर्याद दाखल करून जन्मदात्या आईसह बाळाच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या चौघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून, या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.अवघ्या 1 महिन्याच्या चिमुरड्याचा 1 लाख 20 हजार रुपयांत सौदा झाल्याने एकच खळबळ उडाली. मातेनेच बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.