छप्पर फाड के! आधी ईश्वरचिठ्ठीने ग्रामपंचायत निवडणुकीत विजय, आता थेट सरपंचपदाची लॉटरी

| Updated on: Feb 01, 2021 | 3:51 PM

Chandrapur Gram Panchayat Election Sarpanch : सात सदस्यांपैकी अनुसूचित जमाती गटात मोडणाऱ्या एकमेव महिला सदस्य असल्याने आशा मडावींचा विजय सोपा झाला

छप्पर फाड के! आधी ईश्वरचिठ्ठीने ग्रामपंचायत निवडणुकीत विजय, आता थेट सरपंचपदाची लॉटरी
Follow us on

चंद्रपूर : ‘देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके’ हे गाणं चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्या आशा मडावी यांच्याबाबत तंतोतंत लागू झालं आहे. ईश्वरचिठ्ठीने सदस्य झालेल्या मडावींना आता थेट सरपंचपदाची लॉटरी लागली. अनुसूचित जमातीला आरक्षण मिळाल्यामुळे गटातील एकमेव उमेदवार असलेल्या आशा मडावी सरपंच झाल्या. (Chandrapur lady who won Gram Panchayat Election by luck becomes Sarpanch)

ग्रामपंचायत निवडणुकीत समसमान मतं

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून आशा मडावी आणि कल्पना मडावी या दोन उमेदवार आमनेसामने होत्या. निवडणुकीचा निकाल लागला आणि दोन्ही उमेदवारांना समसमान 58 मतं मिळाली.

ईश्वरचिठ्ठीने आशा मडावी ग्रामपंचायत सदस्यपदी

राजकारणात शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. समान मतं मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने ग्राम पंचायत सदस्यपदाचा निकाल ठरवण्यात आला. राजकारणात राजयोग महत्वाचा आहे, असे म्हणतात. विहीरगावच्या घटनेने याची प्रचिती दिली. अनपेक्षितपणे विजयी होण्याच्या आनंदात असतानाच त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कारण सदस्यपदी निवडून आलेली महिला उमेदवार आता गावची प्रथम नागरिक होणार आहे.

सरपंचपदाचे आरक्षण निघताच मडावी निर्विवाद

सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले. त्यामध्ये विहीरगावचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव निघाले. ही बाब समजताच आशा मडावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद झाला. कारण मडावींचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला. गावात सात सदस्यांपैकी अनुसूचित जमाती गटात मोडणाऱ्या त्या एकमेव महिला सदस्य होत्या. (Chandrapur lady who won Gram Panchayat Election by luck becomes Sarpanch)

ज्या पॅनलकडून आशा मडावी लढल्या, त्याचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले होते. पण आता त्यांच्या गटाच्या उमेदवार गावच्या सरपंच होत असल्याने त्यांनीही उत्सव साजरा केला. विहीरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आणि आरक्षण सोडतीत आलेल्या या योगायोगाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.

संबंधित बातम्या :

जेव्हा माजी राष्ट्रपतींच्या भाचेसूनेचा ग्रामपंचायतीत ‘ईश्वर’ पराभव करतो

ग्राम ‘पंचाईत’! राष्ट्रवादी-भाजपला समसमान जागा, तरी सत्तेची दोरी अपक्षाच्या हाती

(Chandrapur lady who won Gram Panchayat Election by luck becomes Sarpanch)