महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जेव्हा माजी राष्ट्रपतींच्या भाचेसूनेचा ग्रामपंचायतीत ‘ईश्वर’ पराभव करतो

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जेव्हा माजी राष्ट्रपतींच्या भाचेसूनेचा ग्रामपंचायतीत 'ईश्वर' पराभव करतो

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: नाडगाव ग्रामपंचायतीत प्रतिभाताई पाटील यांचे भाचे माजी पंचायत समिती सभापती वीरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रिंगणात होत्या. (Jalgaon Gram Panchayat Pratibha Patil)

अनिश बेंद्रे

|

Jan 19, 2021 | 9:43 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. बोदवड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निकालात प्रस्थापितांना हादरे बसले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसूनेला पराभवाचा धक्का बसला. विशेष म्हणजे ईश्वर चिठ्ठीने निकाल काढल्यानंतर त्या पराभूत झाल्या. तर बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून पुतण्याचाही पराभव झाला. (Jalgaon Bodawad Gram Panchayat Pratibha Patil Daughter in law defeat)

प्रतिभाताई पाटलांची भाचेसून रिंगणात

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात नाडगाव ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता होती. या ग्रामपंचायतीत माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे म्हणजेच कॉंग्रेस नेते असलेले माजी पंचायत समिती सभापती वीरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रिंगणात होत्या. रंजनाकौर वीरेंद्रसिंग पाटील यांना कॉंग्रेसच्या पॅनेलतर्फे उमेदवारी होती. त्यांच्याविरोधात योगिता श्रीकृष्ण लसूनकर अपक्ष रिंगणात उतरल्या होत्या.

ईश्वरचिठ्ठीमुळे काँग्रेसला धक्का

दोन्ही उमेदवारांना 302 इतकी समसमान मतं पडली होती. यामुळे एका उमेदवाराला विजयी करण्यासाठी ईश्‍वर चिठ्ठीने निकाल घोषित करण्याचा निर्णय झाला. त्‍यानुसार रंजनाकौर वीरेंद्रसिंग पाटील पराभूत झाल्या. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुक्ताईनगरमध्ये ‘आकड्यांचा’ खेळ

मुक्ताईनगरमध्ये 40 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे, तर 35 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. भाजपने 12 ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्याचा दावा केला आहे. निवडणूक केवळ 51 ग्रामपंचायतींची झाली असताना दावे-प्रतिदाव्यांमुळे एकूण गणती 90 वर पोहोचली आहे. सरपंचपदाची निवड नंतरच खरे चित्र स्पष्ट होतील

भुसावळ तालुक्यात ग्रामपंचायत पॅनलविना अनेक गावांमध्ये निवडणूक झाली. मात्र विजयाचे दावे प्रतिदावे सर्वच पक्षांनी केले आहेत. भुसावळ तालुक्यातील साकरी आणि बोहर्डी येथे समान मतं पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे यांचा पराभव झाला आहे

“ना भाजप, ना राष्ट्रवादी, आम्ही खडसे परिवाराचे”

कोथळी ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची असून दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित नऊ जागांपैकी 5 ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला आहे, तर सहा उमेदवारांनी संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं आहे. आम्ही ना राष्ट्रवादीचे, ना भाजपचे, आम्ही खडसे परिवाराचे असल्याचे त्यांनी म्हटल्याने गोंधळ उडाला. (Jalgaon Bodawad Gram Panchayat Pratibha Patil Daughter in law defeat)

वडोद्यात भाजपला बहुमत राखण्यात अपयश

मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे डॉक्टर राजेंद्र फडके यांच्या गावात राष्ट्रवादी-भाजपला समसमान जागी विजय मिळाला.
त्यामुळे निर्विवाद बहुमत राखण्यात भाजपला अपयश आले. डॉ. फडके हे ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक आहेत. यांच्या पुरस्कृत भाजपच्या समर्थक उमेदवारांना 7, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीलाही 7 अशा एकूण 14 जागा मिळाल्या.

पाच पत्रकारांची बाजी

रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये पत्रकारांनी बाजी मारली. या ग्रामपंचायत निवडणुकीत 5 पत्रकार विजयी झाले.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष असलेल्या विवरे बुद्रुक येथील पत्रकार वासुदेव नरवाडे हे पुन्हा विजयी झाले. सलग 15 वर्षांपासून नरवाडे हे निवडून येत आहेत. तालुक्यातील काही ठिकाणी पत्रकारांना आपल्या परिवारातील मुले तर काही ठिकाणी पत्नीला विजयी करण्यात पत्रकारांना यश मिळाले आहे.

संबंधित बातम्या :

…ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर…, संजय राऊतांचा अग्रलेखातून भाजपला इशारा

जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

(Jalgaon Bodawad Gram Panchayat Pratibha Patil Daughter in law defeat)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें