अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, छत्रपती शिवाजी पार्कातील आंदोलन पडलं महागात; पोलिसांनी अखेर…
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का बसला आहे. अभिजीत दिपकेंना छत्रपती शिवाजी पार्कातील आंदोलन महागात पडलं आहे.

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मोठा हादरा बसला आहे. दिपकेंना छत्रपती शिवाजी पार्कात आंदोलन घेणे महागात पडलं आहे. शिवाजी पार्कात परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी अभिजीत दिपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपके यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्याने दिपकेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने मुंबईच्या शिवाजी पार्कात आंदोलन केलं. या आंदोलनासाठी देशभरातील तरुण शिवाजी पार्क परिसरात जमले होते. या आंदोलनाला सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. सीजेपीच्या आंदोलनाला छत्रपती शिवाजी पार्कातील स्थानिकांचा विरोध होता. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता कॉक्रोच जनता पार्टीने छत्रपती शिवाजी पार्काजवळ आंदोलन करण्यावर ठाम होते. विरोध करणारे स्थानिक नसून भाजप पदाधिकारी असल्याचाही आरोप दिपकेंनी केला होता. त्यानंतरही अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलनस्थळी जंगी सभा झाली. या सभेतून अभिजीत दिपकेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासहित पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
500 आंदोलकांवरही गुन्हा दाखल
शिवाजी पार्क परिसरात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आंदोलकांमध्ये सीजेपीचे अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका,सौरभ दास यांचा समावेश आहे. तसेच आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी, योगेश इंगळे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती शिवाजी पार्कात २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ दरम्यान आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही विनापरवाना जमाव जमवून सभा आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक रस्त्यावर सभा घेऊन मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), (३), १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
वकिलांकडूनही तक्रार
तत्पूर्वी, वकील सिद्धी देवळेकर यांनी दिपकेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. परवानगी नसताना आंदोलन केल्याने परिसराची शांतता भंग झाल्याचा वकिलाचा आरोप आहे. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या 2013 मधील एका निवड्याचा दाखला दिला. या निवाड्यात छत्रपती शिवाजी पार्कात कोणीही आंदोलन करू शकत नाही, असा संदर्भ असल्याचा वकिलाचा दावा आहे. मुंबई पोलिसांनी देखील आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही आयोजित केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना मोठा त्रास झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.