समलैंगिक प्रेम, घरी बोलवलं, पण घडलं भलतंच; हादरवून टाकणारी घटना समोर; प्रकरण पोलीस ठाण्यात!

अलीकडे डेटिंग ॲप्सचा वापर करून अनेकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीत अशाच एका प्रकरणात, ॲपवरून ओळख वाढवून घरी बोलावले असता लाखो रुपयांचे सोने चोरीला गेलं. पुढे काय घडलं ?

समलैंगिक प्रेम, घरी बोलवलं, पण घडलं भलतंच; हादरवून टाकणारी घटना समोर; प्रकरण पोलीस ठाण्यात!
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 27, 2026 | 9:21 PM

सुनील जाधव, रिपोर्टर :  आजकाल डेटिंग ॲपचा वापर बराच वाढला असून बरेच लोकं सर्रास या ॲपचा वापर करताना दिसतात. मात्र याच ॲपचा वापर करणं आणि ओळख वाढवणं डोंबिवलीतल्या एका नामांकित व्यक्तीला बलतंच महागात पडलं आहे. कारण ॲपवरून ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला तर त्याने घरी बोलावलं, पण त्यानंतर जे झालं त्याने ती व्यक्ती चांगलीच हादरली. समलैंगिक डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भेटीसाठी घरी जायचं, संधी साधायची आणि घरातील सोन्याचे दागिने लंपास करायचे अशी आरोपीची मोडस ऑपरंडी होती. बरं ज्यांच्या घरी चोरी व्हायची ते संकोचामुळे तक्रार नोंदवायला पुढे यायचे नाहीत, यामुळेच आरोपीचं फावत होतं. पण डोंबिवलीत त्याचा अंदाज सपशेल चुकला, ज्याच्या घरात त्याने चोरी केली त्या इसमान हिंमत गोळा करत विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सगळा प्रकार कथन करत अखेर तक्रारही दाखल केली. पोलिसांनी त्या आधारे कसून तपास करत आरोपी प्रवीण बोचरे याला बेडया ठोकल्या.

नेमकं काय घडलं ?

डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. समलैंगिक डेटिंग ॲपच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची प्रवीण बोचरे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला आणि भेटीसाठी संबंधित व्यक्तीने तरुणाला आपल्या घरी बोलावलं.

घरी आल्यानंतर काही वेळ दोघे एकत्र होते. त्यानंतर आरोपी घरातून निघून गेला. मात्र, तो गेल्यानंतर काही वेळातच घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे संबंधित व्यक्तीच्या लक्षात आलं. या प्रकारामुळे त्याला मोठा धक्का बसला. सुरुवातीला वैयक्तिक बाब उघड होण्याच्या भीतीने तक्रार दाखल करण्याबाबत संबंधित व्यक्ती संकोच करत होती. मात्र, मित्रांच्या मदतीने अखेर त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच विष्णूनगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक तपास, उपलब्ध माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रवीण बोचरे याचा माग काढला आणि त्याला अटक केली.

आणखी एकालाही असंच गंडवलं

धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीने याच पद्धतीने आणखी एका व्यक्तीला लक्ष्य केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यामुळे आरोपीने डेटिंग ॲपच्या माध्यमातून आणखी किती जणांशी संपर्क साधला आणि अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीची न्यायालयीन प्रक्रियेनंतर आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली असून विष्णूनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Follow Us