भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी वाढल्या, ईडीच्या छापेमारीत सापडले तब्बल…

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर ईडीची मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या धाडीत काय काय सापडले? जाणून घ्या

भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी वाढल्या, ईडीच्या छापेमारीत सापडले तब्बल...
ashok kharat 1
| Updated on: Apr 14, 2026 | 8:20 AM

नाशिकचा भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशोक खरातवर प्रवर्तन संचालनालयाने (ED) सक्त कारवाई करत आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड केले आहे. लैंगिक शोषण, फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अशोक खरातचा आर्थिक गैरव्यवहार तपासण्यासाठी ईडीने छापेमारी केली. या काळात ईडीने नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील एकूण ११ ठिकाणांवर धाडी टाकल्या.

अशोक खरात प्रकरणी ईडीच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अशोक खरात सामान्य वस्तूंचा प्रसाद किंवा पवित्र वस्तू म्हणून प्रचार करायचा. त्यामध्ये दैवी उपचारशक्ती असल्याचा खोटा दावा करून तो पीडितांची आर्थिक लूट करत असे, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अशोक खरातने नाशिक जिल्ह्यातील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये त्रयस्थ व्यक्तींच्या नावाने अनेक बँक खाती उघडली होती. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये तो स्वतः नॉमिनी होता. या सर्व व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याने आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक या खात्यांशी लिंक केला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

ईडीच्या धाडीत काय सापडले?

लोकांकडून खंडणी आणि फसवणुकीतून जमा झालेला पैसा अशोक खरातने त्याचा चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे आणि त्याचा मुलगा ललित पोफळे यांच्या मदतीने विविध जमिनींमध्ये गुंतवल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ईडीने ६ एप्रिल २०२६ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) खरातविरुद्ध गुन्हा (ECIR) दाखल केला होता. १३ एप्रिल २०२६ रोजी पहाटेपासून सुरू झालेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

पुण्यातील प्रकाश पोफळे यांच्या निवासस्थानातून ४२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशोक खरातच्या तब्बल १० कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटली असून, त्यामध्ये विविध जमिनींचा समावेश आहे. ईडीने अशोक खरातची आलिशान मर्सिडीज बेंझ गाडी जप्त केली आहे. ईडीने खरातची २ कोटी ५० लाख रुपयांची बँक खाती गोठवली आहेत.

अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ

दरम्यान अशोक खरातवर सध्या महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, खंडणी आणि जमिनी बळकावणे अशा विविध गंभीर आरोपांखाली ११ तक्रारी दाखल आहेत. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाचा मुख्य तपास सुरू असतानाच आता ईडीने आर्थिक बाजू हाताळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या खरात न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणातील मोठ्या राजकारण्यांचा सहभाग आणि हवाला रॅकेटचाही ईडीकडून कसून तपास सुरू आहे.

Follow Us