सासरच्यांकडून हार्ट अटॅकचा बनाव, फक्त 5 सेकंदाच्या व्हिडीओने संपला खेळ, फैजलाच्या मृत्यूचं गूढ उकललं, नेमकं काय घडलं?
नागपूरमधील नवविवाहिता फैजला जबिन मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. हार्ट अटॅक नव्हे तर गळा आवळून हत्या केल्याचा पोस्टमार्टम अहवालात खुलासा, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल.

अमरावती येथील सौदागरपुरा परिसरातील रहिवासी असलेल्या नवविवाहित फैजला जबिनच्या मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. फैजला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) झाला नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलचा प्राथमिक शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल नुकताच समोर आला आहे. या खळबळजनक प्रकरणाने अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती, सासरे आणि भासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना तात्काळ अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमरावतीच्या सौदागरपुरा येथील फैजला जबिन हिचा विवाह नागपूर येथील तरुणाशी झाला होता. १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास फैजलाचा नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तिच्या अमरावतीमधील आई-वडिलांना हा निरोप देण्यात आला होता. या धक्कादायक बातमीने मुलीच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फैजला हिच्या मृतदेहावर अमरावती येथे अत्यंत दुःखी वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका व्हिडीओमुळे फुटले भांडे
फैजलावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही वेळातच तिच्या कुटुंबियांच्या हाती एक व्हिडिओ लागला. या व्हिडीओमध्ये मृत फैजला हिच्या मानेवर गंभीर जखमा असल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सासरच्या मंडळींनीच फैजला हिचा घातपात केला असावा, असा संशय तिच्या माहेरच्यांना आला होता. याप्रकरणी त्यांनी विलंब न करता अमरावती येथील नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले. यानंतर सासरच्या मंडळींनीच फैजला हिची हत्या केल्याची तक्रार केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा दंडाधिकार्यांच्या परवानगीने स्मशानभूमीतून फैजला हिचा दफन केलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन हॉस्पिटल) दाखल करण्यात आला.
सासरच्या लोकांचा खोटेपणा उघड
यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात फैजला हिचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आले होते. या अहवालाने सासरच्या लोकांचा खोटेपणा उघडकीस आणला. हा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत फैजला हिचा पती, सासरे आणि भासरा (दिरी) या तिघांविरोधात नागपूर आणि अमरावती पोलिसांच्या समन्वयाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील दोघा संशयितांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस आता या हत्येमागील मुख्य कारण काय, हुंड्यासाठी छळ होत होता की इतर काही कौटुंबिक वाद होता या दिशेने पुढील तपास करत आहेत.