Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत…2 ओळींच्या संदेशात नेमकं काय?
तुकाराम मुंढे यांच्यावर एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवताच त्यांची एफडीए आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता तुकाराम मुंढे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून स्पष्टीकरण दिलंय.

Tukaram Mundhe Transfer : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे धडाडीचे आणि कर्तव्यकठोर असे अधिकारी मानले जातात. भ्रष्टाचार, कर्तव्यात कुचराई करणाऱ्यांचा मुंढे यांना टोकाचा तिटकारा आहे. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे आणि कार्यशैलीमुळे आतापर्यंत अनेकदा त्यांची बदली झालेली आहे. सध्या ते राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही कारकीर्द चांगलीच गाजत आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट अन्नाविरोधात त्यांनी मोहीम उघडल्याने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशात, परदेशातही त्यांच्या कार्याची वाहवा होतेय. आता राज्य सरकारने नुकतेच त्यांच्यावर एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. एमपीएससीच्या परीक्षांत झालेल्या फेरफुटीच्या मुळाशी ते जाणार आहेत. दरम्यान, एकीकडे ही महत्त्वाची जबाबदारी मिळालेली असतानाच दुसरीकडे त्यांची एफडीए विभागातून बदली झाली असल्याचा दावा केला जात होता. तशा चर्चाही रंगल्या होत्या. याच बदलीच्या चर्चेवर खुद्द तुकाराम मुंढे यांनीच भाष्य केलंय.
मुंढे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
तुकाराम मुंढे यांना एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी मिळताच त्यांची एफडीए आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता तुकाराम मुंढे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून या चर्चेला पूर्णविराम दिलाय. माझी कुठेही बदली झालेली नाही. मी अजूनही एफडीएचा आयुक्त असून अन्नपदार्थांच्या भेसळीविरोधातील मोहीम चालूच राहील, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय.
तुकाराम मुंढे आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
“नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे,” असं तुकाराम मुंढे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलंय. सोबतच त्यांनी ट्रस्ट हा हॅशटॅक आवर्जून जोडला आहे.
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 12, 2026
तुकाराम मुंढे पेपरफुटी प्रकरणाचा गुंता सोडवणार का?
दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. अनेक परीक्षांत पेपरफुटी झालेली आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. तसेच या प्रकरणाची चौकशी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याच्या हातून व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीत तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर चौकसी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारतर्फे आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. आमदार रोहीत पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुंढे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.