भाजपाचा हा मंत्री अंतरवाली सराटी गावच दत्तक घेणार, जिल्हाधिऱ्यांनी केली मोठी घोषणा
टंचाई ग्रस्त गावांना दुष्काळाच्या झळामधून बाहेर काढण्यासाठी सरकार आता जालना जिल्ह्यात 'गाव दत्तक अभियान’ राबविण्यात येणार आहे. यामुळे टंचाईग्रस्तांना गावांना दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी म्हटले आहे.

एकीकडे राज्यात १९७२ नंतरचा मोठा दुष्काळ पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात असताना आता सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिसरी मदत फेरी जाहीर केली आहे. तसेच दुष्काळाच्या झळा बसलेल्या गावांची यादीत देखील राज्य सरकारने वाढ केली आहे. दरम्यान, आता मराठा आंदोलनाचे केंद्र राहिलेल्या मनोज जरांगे यांचे कार्यक्षेत्र असलेले अंतरवाली सराटी गावच आता पालकमंत्री पंकजा मुंडे दत्तक घेणार आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती,वाढते तापमान, आटलेले जलाशय आणि करपलेली पिके अशा दुष्काळी संकटाच्या छायेत असलेल्या गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दुष्काळाच्या झळांमधून बाहेर काढून दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘गाव दत्तक अभियान’ राबविण्यात येणार आहे.
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून लोकसहभागाला प्राधान्य देत सामाजिक दायित्वाचा नवा आदर्श निर्माण करणारा ‘गाव दत्तक अभियान’ या अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. याला राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद देत मराठा आरक्षण आंदोलनाच केंद्रबिंदू असलेले अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
लवकरच पालकमंत्री पंकजा मुंडे अंतरवाली सराटीला भेट देणार असल्याचंही जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आणि अतिसंवेदनशील गावांमधील नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी तसेच मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, उद्योजक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांना गरजूंशी थेट जोडण्यासाठी त्रिस्तरीय सूत्रावर आधारित हे अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.