डिझेल मिळालं नाही म्हणणं चुकीचं, पण कारवाई करू, आरोग्य मंत्र्यांचं विधान; गर्भवतीच्या पोटात बाळ दगावल्याचं प्रकरण तापणार?

हिंगोलीत डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने एका गर्भवती महिलेने बाळ गमावले. या हृदयद्रावक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डिझेलअभावी सेवा नाकारणे चुकीचे असल्याचे सांगत चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले.

डिझेल मिळालं नाही म्हणणं चुकीचं, पण कारवाई करू, आरोग्य मंत्र्यांचं विधान; गर्भवतीच्या पोटात बाळ दगावल्याचं प्रकरण तापणार?
गर्भवतीचं बाळ दगावल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 28, 2026 | 3:09 PM

हिंगोलीत एका गर्भवती महिलेवर आभाळ कोसळलं आहे. केवळ डिझेल नसल्यामुळे तिला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. त्यामुळे या महिलेच्या पोटातच बाळ दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारावर एकच संताप व्यक्त केला जात आहे. तर, या प्रकारामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. या घटनेवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डिझेल मिळालं नाही म्हणून रुग्णवाहिका नाकारली असं म्हणणं चुकीचं असल्याचं म्हणत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

प्रकाश आबिटकर नांदेडमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेल मिळालं नाही म्हणून उपचार झाले नाहीत, असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून कार्यवाही करू. कारण रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी निधीची तरतूद आहे. यासाठी मनुष्यबळ आहे. आम्ही जे योग्य इन्फ्रास्ट्रक्चर उभ केलं आहे, त्याचा समाजाला योग्य उपयोग झाला नाही तर याच्याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात येतील. ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्यावर आम्ही कारवाई करू, असं प्रकाश आबिटकर म्हणाले.

साठा थांबवा

इतर देशाच्या तुलनेत देशात आणि महाराष्ट्रात डिझेलची परिस्थिती चांगली आहे. आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित करत असताना अनावश्यक, भीतीपोटी लोकांनी साठा करण्याचा प्रकार थांबवावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

त्या बाळाची हत्याच

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सत्ताधारी पक्षातील लोक सांगतात की राज्यात इंधनाची टंचाई नाही, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र एका बाळाला जीव गमावावा लागला आहे.

हिंगोलीच्या जवळा बाजार येथे एका गरोदर महिलेला जी प्रसुतीसाठी होती. तिला प्रचंड वेदना होत असताना 102, 108 वर तिच्या कुटुंबीयांकडून संपर्क केला गेला मात्र डिझेल नसल्याचे कारण देत महिलेला रुग्णवाहिका नाकारली गेली. महिलेला तब्बल अडीच तास वाट पहावी लागली, परिणामी तिला तिचं बाळ गमवावे लागले. सरकारने सांगावे यात दोषी कोण आहे ? आरोग्य प्रशासन? रुग्णवाहिकेचे कर्मचारी? की शासन जे पेट्रोल डिझेलबाबत परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरले आहे? त्या बाळाची एकाप्रकारे हत्याच झाली आहे. सांगा…. कुणावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे? असे प्रश्न खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

Follow Us