वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर…नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर!

नाशिक शहर पोलिसांमध्ये नऊ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतर करण्याचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केलेले आहेत. यात चार महिलांनी लैंगिक शोषण आणि छळवणूक तर इतर तीन महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे.

वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर...नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर!
nashik company
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2026 | 9:31 PM

Nashik Company : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या कथित लैंगिक अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणात काय तपास झाला? पोलिसांना कोण-कोणकोणती माहिती मिळाली? पुढे नेमकं काय केलं जाणार? याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सविस्तर सांगितलं आहे. आज (15 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी आमच्या महिला पोलिसांनी वेषांतर केलं. तिथे जाऊन तपास केला, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात कुठे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का? हे तपासले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तीन महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली

या प्रकरणात नाशिक शहर पोलिसांमध्ये नऊ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतर करण्याचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केलेले आहेत. यात चार महिलांनी लैंगिक शोषण आणि छळवणूक तर इतर तीन महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे. या प्रकरणांमध्ये एकूण आठ आरोपी आहेत. यातील सहा पुरुष आरोपी हे एकमेकांचे संबंधित आहेत. तर दोन आरोपी महिला आहेत, अशी माहिती संदीप कर्णिक यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासले जाणार

या प्रकरणातील आरोप निदा खानवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा आहे तर, अश्विनी चैनाणी हिने पीडित महिलांना मदत न करता आरोपींना पाठीशी घातले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास केला जातोय. या आरोपींना बाहेरच्या कोणत्या कट्टरपंथी संघटना मदत करत होत्या किंवा पैसे पुरवत होत्या का याचा तपास नाशिक पोलीस करत आहे. त्यासाठी SIT, ATS आणि NIA ह्यासोबत पत्र व्यवहार सुरू आहे. यात काही पुरावे आढळ्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला पोलीस वेषांतर करून कंपनीत गेले

ह्या नऊ गुन्ह्यात पहिली तक्रार ज्या पीडित महिलेने दिली त्यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती. पोलिसांनी तिची काऊन्सलिंग करून तिला धीर देऊन तिची तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणात काही पीडित महिला समोर आल्या आणि त्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या सर्व घटना सविस्तरपणे सांगितले. आमच्या नाशिक पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेषांतर केले होते. त्या कंपनीत गेल्या होत्या. तिथे जाऊन त्यांनी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. पहिल्या तक्रारीत जी पीडित महिला आहे त्यात आरोपी तिला रिसॉर्टवर घेऊन गेला होता. त्या रिसॉर्टमधील काही पुरावे जप्त केले आहेत, असेही कर्णिक यांनी सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us