IPS promotion | नाशिकच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचे आयपीएसपदी प्रमोशन, राज्यात 14 जणांना बढती

| Updated on: Jan 15, 2022 | 12:39 PM

महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने 2019 आणि 2020 मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती.

IPS promotion | नाशिकच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचे आयपीएसपदी प्रमोशन, राज्यात 14 जणांना बढती
Sunil Kudasane, Amol Tambe, Sanjay Barkund
Follow us on

नाशिकः नाशिकच्या पोलीस (Nashik Police) दलासाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी. अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नती मार्गी लागली असून, त्यात नाशिकच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना आता आयपीएसपदी प्रमोश मिळाले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक एसबीचे अधीक्षक सुनील कुडासने, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड व माजी पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांचा समावेश आहे.

14 अधिकाऱ्यांना पदोन्नती

केंद्र सरकारने राज्यातील एकूण 14 अधिकाऱ्यांना आयपीएसची पदोन्नती दिली आहे. खरे तर 2000 ते 2004 वर्षात महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने 2019 आणि 2020 मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती. अखेर काल मकरसंक्रांतीच्या दिवशी या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश येऊन धडकले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची मकरसंक्रांत गोड झाली, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये होती.

मालेगावची परिस्थिती सुधारली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक असलेले सुनील कुडासने यांचे या यादीत प्रमोशन झाले आहे. कुडासने यांनी अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावमध्ये चार वर्षे अप्पर अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. ते 2012-2016 या काळामध्ये मालेगावमध्ये होते. त्यानंतर ते राज्य गुप्तवार्ता विभागात गेले. आता गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. मालेगावमध्ये कोरोना वाढला तेव्हा कुडासने यांची तेथील सेवा पाहता येथील परिस्थिती सुधारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ती परिस्थिती सुधारूनही दाखवली.

या अधिकाऱ्यांचे प्रमोशन

माजी उपायुक्त आणि सध्या बांद्रा येथील उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, श्रीकृष्ण कोकाटे, एस. पी. निशाणदार, संजय लाटकर, सुनील भारद्वाज, एन. ए. अष्टेकर, मोहन दहिकर, विश्वास पानसरे, पी. एम. मोहिते, वसंत जाधव, श्रीमती एस. पाटील आदी एकूण चौदा अधिकाऱ्यांची बढती झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे अधिकारी इतर ठिकाणी जाणार की आहे त्याच ठिकाणी सेवा बजावणार याकडे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!

Nashik | निवडणुकीत तेरावा; 159 झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी सर्वपक्षीय खटाटोप, पुढे काय होणार?

Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?