कल्याण गांधारी-वडवली रिंग रोड अपघातांचा हॉटस्पॉट… जीवघेण्या रेसिंगमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण गांधारी-वडवली रिंग रोड... पण आता ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट... जीवघेण्या रेसिंगमुळे नागरिकांचा जीव धोक्यात... डोक्याला, उजव्या हाताला गंभीर दुखापत आणि...

कल्याण गांधारी-वडवली रिंग रोड अपघातांचा हॉटस्पॉट... जीवघेण्या रेसिंगमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
| Updated on: Feb 22, 2026 | 10:27 AM

कल्याण – डोंबिवलीत स्टंट करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरांना जोडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘रिंग रोड’ तयार करण्यात आला. पण यावर मार्गावर तरुणांची स्टंटबाजी सुरु असते आणि स्टंटबाजी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा या शहरांना जोडण्यासाठी उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘रिंग रोड’ प्रकल्प आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठला आहे. कल्याण जवळील गांधारी-वडवली या नवीन रिंग रोडवर रात्रीच्या वेळी होणारी कार रेसिंग आणि जीवघेणी स्टंटबाजी यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या स्टंटबाजांच्या बेजबाबदारपणामुळे आपले दुकान बंद करून घरी जाणाऱ्या एका 50 वर्षीय निष्पाप नागरिकाला आपल्या प्राणाशी झुंज द्यावी लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास विठ्ठल कुंभार (वय 49) हे कल्याण पश्चिम येथील ‘आदित्य ऑटोमोबाईल’ गॅरेजचे मालक आहेत. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 ते 11 च्या सुमारास ते आपली ॲक्टिव्हा दुचाकी (MH 05 CN 0263) घेऊन काम संपवून घरी परतत होते. नवीन वडवली रोडवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव कारने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, विकास कुंभार यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघात केल्यानंतर संबंधित कार चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता तिथून पळ काढला. अखेर त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी जखमी विकास कुंभार यांना तातडीने कल्याणच्या वेदान्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात केले .

मात्र या अपघातात त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आयुर हॉस्पिटल येथील आयसीयू (ICU) मध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या मुलाने, श्रेयश विकास कुंभार याने खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे नव्याने बांधण्यात आलेल्या रिंग रूट प्रकल्प अजून सर्वसामान्यांसाठी सुरू झालं नाही मात्र नवीन गुळगुळीत रस्ता झाल्यामुळे रात्रीच्या वेळी तरुण मुले येथे कार रेसिंग आणि दुचाकीवर जीवघेणे स्टंट करतात.

पोलिसांनी यापूर्वी काही कारवाया केल्या असल्या तरी, स्टंटबाजांवर कायमस्वरूपी वचक बसलेला नाही.सीसीटीव्ही कॅमेरे आणि गतिरोधक (Speed breakers) नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार रेसिंग व मोटरसायकल स्टंटबाजी होताना पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांसह वॉक साठी येणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होतात.

या भरघाव वेगाच्या गाड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि जखमीच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या परिसरात पोलिसांनी ग्रस्ती घालत भरधाव वेगाने गाडी चालवणार व कारवाई करावी अशी मागणी होत आहे.