VIDEO | पंचगंगेच्या काठावर म्हशी पळवण्याची स्पर्धा, पोलिसांची एन्ट्री होताच म्हशींसह पळापळ

| Updated on: Apr 13, 2021 | 4:18 PM

कोल्हापुरात पंचगंगेच्या काठावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी म्हशी पळवण्याची स्पर्धा भरवण्याची परंपरा आहे (Kolhapur buffalo running competition )

VIDEO | पंचगंगेच्या काठावर म्हशी पळवण्याची स्पर्धा, पोलिसांची एन्ट्री होताच म्हशींसह पळापळ
कोल्हापुरात पंचगंगेकाठी म्हशी पळवण्याची स्पर्धा
Follow us on

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या काठावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याची स्पर्धा भरवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी एन्ट्री घेताच स्पर्धक-प्रेक्षकांची धावपळ उडाली. स्पर्धकांनी तर थेट म्हशींसोबत धूम ठोकली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Kolhapur buffalo running competition on Gudhi Padwa trending video)

म्हशी पळवण्याची स्पर्धा

कोल्हापुरात पंचगंगेच्या काठावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी म्हशी पळवण्याची स्पर्धा भरवण्याची परंपरा आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करा, असे आवाहन प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जमावबंदीच्या आदेशांचं उल्लंघन

प्रशासनाच्या जमावबंदीच्या आदेशांचं उल्लंघन करत कोल्हापुरात दरवर्षीप्रमाणे म्हशी पळवण्याची स्पर्धा भरवण्यात आली. पंचगंगा नदीच्या काठावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धत आपापल्या म्हशींसह अनेक स्पर्धक सहभागीही झाले. स्पर्धा ऐन रंगातही आली. जमावबंदीचा आदेश असताना स्पर्धेची ईर्षा बहरली होती.

पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल एन्ट्री

इतक्यात, पोलिसांनी ‘सिंघम’ स्टाईल एन्ट्री घेतली. पोलीस आल्याचे पाहताच प्रेक्षक आणि स्पर्धकांचे धाबे दणाणले. जवळपास तीनशेहून अधिक जणांची पळता भुई थोडी झाली. अनेक जणांवर म्हशींना सोबत घेऊन पळायची वेळ आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पाहा व्हिडीओ

बीडमधील गदर्भस्वारीची परंपरा खंडित

होळी, धुलिवंदन ते रंगपंचमी यादरम्यान महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक पंरपंरांचंन पालन केलं जातं. महाराष्ट्राच्या विविध भागात होळी ते रंगपंचमी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली बीड जिल्ह्यातील जावयांची गाढवावरील धिंड काढण्याची पंरपरा यंदा खंडित झाली. केज तालुक्यातील विडा या गावात जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची अनोखी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 80 वर्षांनंतर खंडित झाली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदाच जावयाच्या गदर्भस्वारीचा आनंद ग्रामस्थांना घेता आला नाही.

संबंधित बातम्या :

कोरोनानं केली जावयांची सुटका, बीडमधील गाढवावरुन धिंड काढण्याची परंपरा 80 वर्षानंतर खंडित

(Kolhapur buffalo running competition on Gudhi Padwa trending video)