दबक्या पावलाने यायची, देवघरात जायची अन् नंतर… कोल्हापुरात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरात राहणाऱ्या मानसी खरे या महिला चोरटीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, दुपारच्या वेळी देवघरातून चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या या महिलेकडून ३.२५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

दबक्या पावलाने यायची, देवघरात जायची अन् नंतर... कोल्हापुरात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले
Kolhapur Crime
| Updated on: Feb 24, 2026 | 8:41 AM

राज्यात भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढलेला असतानाच कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलिसांनी एका सराईत महिला चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. मानसी खरे असे या महिलेचे नाव असून ती साने गुरुजी वसाहतीतील देवणे कॉलनीत राहते. मानसी ही केवळ देवघरातील मौल्यवान चांदीच्या मूर्ती लंपास करायची. पोलिसांनी तिच्याकडून तब्बल ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या मूर्ती जप्त केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संशयित मानसी खरे ही साने गुरुजी वसाहत परिसरातील देवणे कॉलनीत राहते. या चोरीच्या घटनांची पद्धत अत्यंत वेगळी होती. ती दुपारच्या वेळी साधारणपणे १ ते ४ या वेळेत घराबाहेर पडायची. या काळात नागरिक सहसा जेवण करून विश्रांती घेत असतात. काही वेळा अनेक नागरिकांचे घराचे मुख्य दरवाजे कडी न लावता केवळ ओढलेले असतात. याचाच फायदा घेत मानसी अत्यंत शांतपणे आणि दबक्या पावलांनी घरात प्रवेश करायची. घरातील सदस्यांचे लक्ष नसल्याचे पाहून ती थेट देवघर गाठायची. यानंतर तिथल्या मौल्यवान चांदीच्या मूर्ती चोरून पसार व्हायची.

२३ डिसेंबर २०२५ रोजी कोल्हापुरातील शुक्रवार पेठ परिसरात राहणारे उदय देवरुखकर यांच्या घरात मोठी चोरी झाली होती. त्यांच्या देवघरातील १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती, मूर्तीच्या डोक्यावरील सोन्याचे किरीट आणि पाचूचे मणी असे साहित्य चोरीला गेले होते. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली होती.

याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांनी आपल्या गुप्त बातमीदारांना सतर्क केले. तपासादरम्यान पोलिसांना एका संशयास्पद महिलेची माहिती मिळाली. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मानसी खरे हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने देवरुखकर यांच्यासह अन्य ठिकाणच्या चोऱ्यांचीही कबुली दिली.

सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता चोरीच्या विविध घटनांमधील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती आढळून आल्या. ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. दरम्यान मानसीने अजून कोणाच्या घरात अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us