जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे करत असलेल्या मागण्या चुकीच्या असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.

जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या... गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
Gunaratna Sadavarte
| Updated on: Aug 29, 2026 | 1:17 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली पण मार्ग निघू शकला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या उपोषणाआधीच मनोज जरांगे यांनी सर्वात मोठी मागणी केली. महाराष्ट्रातील जात पडताळणी समिती रद्द केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. देशात कुठेही नसताना फक्त महाराष्ट्रात जात पडताळणी समिती कशाला हवी, असा सवालही जरांगे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. या उपोषणात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे, असेही आवाहन यादरम्यान त्यांनी केले. यादरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही. जरांगेंच्या मागण्या चुकीच्या आहेत. त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत. आंदोलकांवरील केसेस मागे घेतल्या जाऊ शकत नाहीत. तुमचे जे कोणी रेतीचे ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली. कारण रेतीच्या ठेकेदारांना आरक्षण कळत नसते, रेतीचे माप कळत असते.

आरक्षणाचे तत्व कळण्यासाठी नुसते अभ्यासक असून चालत नाही. इतर जे संशोधक आहेत, आमचे मराठा भाऊ त्यांना विचारा, ते सांगू शकतील. त्यांच्याकडे जावे लागेल. कारण अभ्यासकांच्या वर कोण असते ते प्राध्यापक असतात, त्यानंतर संशोधक असतात. संशोधकांची सर्व भूमिका कोण मांडत असतात, ते वकील असतात. पण तुम्ही कोणाचेच ऐकत नाहीत. मला कोणाची टिंगल टवाळी करायची नाही.

मी संविधानवादी माणूस आहे. कुणबी म्हणून वेगवेगळ्या 40 जाती आहेत. नोंदी नोंदी म्हणून जप जपल्यामुळे कायदे, प्रक्रिया बदलणार नाही. यादरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील मराठा समाजाबद्दल बोलताना गुणरत्न सदावर्ते दिसले. यादरम्यान ते मनोज जरांगे पाटील यांना मी लाडाने मण्या म्हणून शकतो, असे म्हणतानाही ते दिसले. सरकारच्या शिष्टमंडळाला अपयश मिळाले असून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

Follow Us