मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं?
महाराष्ट्रात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला, तर अंबरनाथमध्ये भरधाव कारने धुमाकूळ घातला असून याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या जोरदार धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दुसरीकडे, अंबरनाथ-उल्हासनगर मार्गावर एका भरधाव कारने मध्यरात्री धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केले आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.
एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ट्रकचा चक्काचूर
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास खोपोली हद्दीत एक अत्यंत भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मुंबई मार्गिकेत उलटला. हा अपघात घडला त्यावेळी मागून तांदूळ घेऊन एक ट्रक येत होता. या अपघातानंतर ट्रक चालकाला वाहन कंट्रोल करता आले नाही. यामुळे हा ट्रक थेट उलटलेल्या कंटेनरवर जाऊन आदळला. ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या दोन्ही अवजड वाहनांच्या धडकेच्या कचाट्यात बाजूने जाणारी एक एर्टिगा कारही सापडली. या कारमधील एक ८० वर्षांच्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. हायवे पोलीस आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
अंबरनाथमध्ये भरधाव कारचा थरार
तर दुसऱ्या घटनेत अंबरनाथ ते उल्हासनगर दरम्यान काल मध्यरात्री एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धडक देत अक्षरशः धुमाकूळ घातला. या धडकेत अनेक जण जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात घडताच परिसरातील संतप्त नागरिकांनी फॉलोवर लाईन चौक येथे कारला वेढा घातला. तिची तोडफोड केली. या तोडफोडीत कारचे मोठे नुकसान झाले. तसेच मागची काच पूर्णपणे फुटली आहे. मात्र, नागरिकांच्या या रोषाचा आणि गोंधळाचा फायदा घेत चालक कार सोडून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती शांत केली. फरार चालकाच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन त्याचा शोध सुरू केला आहे.