शेतकऱ्यांसमोर आभाळाएवढं दु:ख, पावसाअभावी हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाणार

राज्यातील विविध भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाण्याची भीती वाटू लागली आहे.

शेतकऱ्यांसमोर आभाळाएवढं दु:ख, पावसाअभावी हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाणार
soyabean farmer
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 12:31 PM

राज्यातील विविध भागात पावसाचा खंड पडला आहे. गेल्या महिनाभरापासून व्यवस्थित पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्याने शेत जमीन तापू लागली आहे. या हवामानाने शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण झालं आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. पाऊस पडत नसल्याने पैसा मिळवून देणारं सोयाबीन पीक हातातून जाणाच्या मार्गावर असल्याती भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुसरा कोणताही उपाय शेतकऱ्यांच्या हाती नसल्याचे समोर येत आहे.

अमरावतीत सोयाबीन पीक धोक्यात

एक महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्यासारखं ऊन तापत असल्याने आणि जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीन पीक धोक्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत सोयाबीन शेंगा भरण्याचा कालावधी असतो. मात्र पाऊसच नसल्याने सोयाबीनची वाढ ही थांबली आहे. तसेच शेंगांचा भरणाही थांबला आहे. पुढील दोन-तीन दिवस पाऊस न आल्यास सोयाबीन पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

लातूरमध्ये शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

पावसाअभावी सोयाबीन करपलं आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील पांढरवाडीत एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकांत मेंढर चरायला सोडली आहेत. पावसाअभावी सोयाबीन हातून गेल्याने शेतकरी सतीश एरंडे यांनी आपल्या सोयाबीनच्या वावरात मेंढर सोडून दिली आहेत. पावसाअभावी रब्बी हंगाम बहुतांश शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे.

शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला ट्रक्टर

सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी संतप्त शेतकऱ्याने 5 एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गाव येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी जळणाऱ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. विकास खंडागळे या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी सोयाबीन पीक पेरण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केला होता. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक शेती पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दक्षिण सोलापुरात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांना उडदाच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आली. दक्षिण सोलापुर तालुक्यातील संभाजी गाजरे या शेतकऱ्याने उडीद पिकावर रोटर फिरवला. पावसाअभावी तब्बल 5 एकर उडदावर शेतकऱ्याने वैतागून रोटर फिरवला. अवघ्या 65 दिवसात उडदाचे पिक येत असल्याने शेतकऱ्यांचा खरीपा उडीदाकडे कल असतो. मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकरीराजा हतबल झाल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us