FDA चा औषध कंपन्यांना दणका! 4 महिन्यांत 19 कोटींचा औषधसाठा जप्त; तुकाराम मुंढेंनी सांगितली संपूर्ण आकडेवारी
Maharashtra FDA Seizes Drug Stock: औषधांच्या काळाबाजारावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने बडगा उगारला आहे. चार महिन्यांत 19.11 कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी 33 FIR दाखल केले आहेत.

राज्यातील औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांमधील अनियमितता रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत FDA कडून एकूण 4,256 तपासण्या करण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान सुमारे 19.11 कोटी रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. विविध प्रकरणांत 33 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 14 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली. त्यांनी संपूर्ण आकडेवारीच सांगितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या चार महिन्यांत औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापनांच्या 965, तर औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या 3,291 तपासण्या करण्यात आल्या. निर्धारित तपासणी उद्दिष्टाच्या तुलनेत 131 टक्के उद्दिष्टपूर्ती झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि नियमभंगाच्या प्रकरणांत एकूण 1,402 नोटिसा बजावण्यात आल्या. नियामक कारवाईअंतर्गत औषध उत्पादन आणि विक्रीचे 288 परवाने रद्द करण्यात आले, तर 856 परवाने निलंबित करण्यात आले.
अशा प्रकारे परवान्यांशी संबंधित एकूण 1,144 कारवाया करण्यात आल्या. याशिवाय छापे आणि जप्तीच्या 115 कारवायांमधून मोठ्या प्रमाणात औषधसाठा ताब्यात घेण्यात आला. विनापरवाना औषधसाठा आणि विक्रीविरोधात 43 कारवाया करण्यात आल्या. आक्षेपार्ह जाहिरातींच्या 31 प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली. बनावट औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित 14, तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित 10 कारवाया करण्यात आल्या. यासोबतच NDPS कायद्यांतर्गत गुंगीकारक औषधांच्या गैरवापराविरोधात नऊ आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित तीन कारवाया करण्यात आल्या.
फसव्या साधर्म्याची ब्रँड नावे आणि लेबलविषयक उल्लंघनांवरही FDA ने कारवाई केली. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत, तसेच औषधांच्या उत्पादन आणि विक्रीतील नियमभंगाला आळा बसावा, यासाठी तपासणी आणि अंमलबजावणीची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.