विधानपरिषदच्या जागावाटपात मिठाचा खडा, दिल्लीवारीनंतरही शिंदे-फडणवीस त्या जागेवर ठाम, काय घडणार?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली असून महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, दिल्ली दौऱ्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा पेच कायम आहे.

विधानपरिषदच्या जागावाटपात मिठाचा खडा, दिल्लीवारीनंतरही शिंदे-फडणवीस त्या जागेवर ठाम, काय घडणार?
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: May 29, 2026 | 1:01 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने या १७ जागांसाठीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली असताना, दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार चर्चा आणि खलबते सुरू झाली आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. त्यातच आता ही जागा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

संभाजीनगरची जागा बनली प्रतिष्ठेची

छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाच्या जागेवर भाजपने आपला दावा भक्कम केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसमोर या जागेबाबत अत्यंत आग्रही भूमिका मांडली आहे. स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून, बदललेल्या राजकीय समीकरणात ही जागा भाजपने लढवल्यास महायुतीला त्याचा मोठा फायदा होईल, असा अहवाल प्रदेश नेत्यांनी केंद्रीय नेत्यांना दिला आहे.

शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला

दुसरीकडे, हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला असल्याने शिंदे गट ही जागा सोडण्यास अजिबात तयार नाही. छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीत प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या जागेवर चर्चा केली. संभाजीनगर हा शिवसेनेचा गड राहिला आहे, त्यामुळे तिथे शिवसेनेलाच जागा सोडावी,” अशी आग्रही भूमिका शिंदे यांनी मांडल्याचे समजते.

जागावाटपाचे मोठे आव्हान

दरम्यान, निवडणूक जाहीर झालेल्या १७ जागांमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासह आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील महायुतीत असल्याने जागांचे विभाजन करण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाची ताकद आणि लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे, याचा सविस्तर आढावा आता घेतला जात आहे.

आता येत्या एक-दोन दिवसांत महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह सर्व १७ जागांचा अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतरच महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाईल.

Follow Us