दुष्काळाचा साखर उत्पादनाला फटका; यंदा 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज
महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 52 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. यंदा 212 कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

योगेश बोरसे टीव्ही9 मराठी : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही 2026-27 चा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा राज्यात सुमारे 89 ते 90 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात सुमारे 99 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. त्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात सुमारे 10 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 212 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले असून, आतापर्यंत 52 कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.
याशिवाय, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. लवकरच राज्यभरातील ऊस गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वासही साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.
212 कारखान्यांचे अर्ज, 52 कारखान्यांना परवाने
दरम्यान, 2026-27 च्या गाळप हंगामासाठी राज्यातील 212 साखर कारखान्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 104 सहकारी आणि 108 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 52 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 सहकारी आणि 32 खासगी कारखाने आहेत. उर्वरित कारखान्यांच्या परवान्यांची प्रक्रिया सुरू असल्याचे साखर आयुक्तांनी सांगितले.
यंदा 89 ते 90 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज
राज्यात यंदा सुमारे 1,157.5 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी सुमारे 900 लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यातून 89 ते 90 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात सुमारे 10 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. मात्र, गाळप सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष गाळपाचा वेग आणि ऊस उपलब्धता यानुसार उत्पादनाचे चित्र अधिक स्पष्ट होईल. हंगाम किती दिवस चालेल, याचा अंदाजही गाळपाच्या प्रगतीनंतरच येईल. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील गाळप हंगाम सरासरी 104 दिवस चालला होता, अशीही माहिती डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.