१३ वर्षीय मुलीला क्रूरपणे संपवलं! संशयित आरोपी कर्नाटकातून ताब्यात, माणगावमध्ये संताप अनावर; घराची जाळपोळ अन्…

Mangaon Minor Girl Murder News: माणगाव हत्याप्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. संशयिताच्या घराची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

१३ वर्षीय मुलीला क्रूरपणे संपवलं! संशयित आरोपी कर्नाटकातून ताब्यात, माणगावमध्ये संताप अनावर; घराची जाळपोळ अन्...
| Updated on: Oct 19, 2026 | 11:26 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १३ वर्षीय चिमुकलीच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण लगमवार याला कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गावात संतापाचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने संशयिताच्या घराची तोडफोड करून घरातील साहित्य रस्त्यावर आणले आणि त्याला आग लावली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर माणगावमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर संशयित आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संशयिताला इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading...

संशयित आरोपीला न्यायालयात आणताच संतप्त महिला न्यायालयाच्या आवारात जमा झाल्या. त्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. काही महिलांनी आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला सुरक्षित घेराव घालून वाहनातून न्यायालयात नेले. मात्र आरोपीला पोलीस संरक्षण दिले जात असताना महिलांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे माणगावमध्ये संतप्त जमावाने संशयिताच्या घराची तोडफोड करून जाळपोळ केली.

इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील माणगाव फाट्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोप पाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या माणगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. संतापाच्या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण शांतता आहे.  संतप्त नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us