आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही, मी जिवंत.. आंतरवालीच्या त्या आरोपांवर जरांगेंचं थेट विधान
आगामी दसरा मेळावा परंपरेनुसार पार पडेल, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे तो साधेपणाने केला जाईल असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमोल खुणे, अजय बारस्कर यांच्या सोबत आता गावातील महिला सहकाऱ्यांनी देखील त्यांना टार्गेट केले आहे. या आंदोलनाचा आपल्या काही फायदाच झाला नाही असा आरोप जरांगे यांच्या सहकारी महिलांनची केला आहे. या पार्श्वभूमीवर आता आंतरवालीतील मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर जरांगे या गावात आले आणि त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला आहे. आपल्या विरोधात मोठे षडयंत्र रचण्यात येत आहे. आपल्याला एकाकी पाडले जात आहे. तरीही मराठा समाजाच्या लेकरांबाळांसाठी शेवटपर्यंत हा लढा सुरुच राहिल असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. आपण जीवंत असेपर्यंत आंतरवालीला डाग लागू देणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनीच आरोप करणे सुरु केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. आपल्याला बदनाम केले जात आहे. मात्र, आपला लढा सुरुच राहिल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीत परतले आणि त्यांची येथे मंडप आणि त्याचे व्यासपीठ काढल्याने ते खीन्न झाले आणि म्हणाले की एवढा जीव तोडून सगळ्यांनी केलेले आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला नाव पण ठेवू नका,सगळे आपलेच आहेत.डोक्यात अजिबात काहीही ठेवू नका लगेच काढून टाका.आपलं गाव आहे, आपल्या राज्यासाठी लढतंय,गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा कल्याण झालं तेवढेच डोक्यात ठेवा. आपल्या गावातल्या माणसाचं अजिबात डोक्यात ठेवायचं नाही कोणी असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांनी म्हटले की, ‘आपण सगळे गाऱ्हाणं पंढरपुरात मांडतो पांडुरंगाकडे त्याचप्रमाणे लोकांच्या वेदना ऐकून घ्यायच्या आणि त्या सोडायच्या यासाठी आपलं आंतरवाली गाव आहे असेही ते म्हणाले. आंतरवाली पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मी जीवंत आहे तोपर्यंत आंतरवालीला डाग लागू देत नाही,आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही. आपलं असं झालं की मायलेकरासारखं घट्ट नातं झाल्यासारखं त्यामुळे ते तुटूच शकत नाही. मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर मलाच करमेनासं झाले आहे असेही ते समाज बांधवांशी संवाद साधताना म्हणाले.