महायुतीला पाठिंबा देताच मनसेत हालचाली वाढल्या, दिग्गजांची समन्वयक म्हणून नियुक्ती, नेमका प्लॅन काय?

| Updated on: Apr 17, 2024 | 5:41 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता मनसे पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मनसे कार्यकर्तेदेखील आता प्रचारात उतरणार आहेत. यासाठी मनसेच्या दिग्गज नेत्यांना समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महायुतीला पाठिंबा देताच मनसेत हालचाली वाढल्या, दिग्गजांची समन्वयक म्हणून नियुक्ती, नेमका प्लॅन काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेत आता हालचालींना वेग आला आहे. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत मनसेचे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. मनसेकडूम मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात समन्वक जाहीर करण्यात आले आहेत. महायुतीच्या नेत्यांना संपर्क साधण्यासाठी मनसेकडून समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे हे पुण्याचे तर मनसे नेते बाळानांदगावकर हे शिर्डी, अहमदनगरचे समन्वयक असणार आहेत.

मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत ठाणे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून अभिजित पानसे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर अविनाश जाधव यांना पालघरचे समन्वयक म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आमदार राजू पाटील यांना भिवंडी आणि कल्याणचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय अविनाश जाधव यांनाही कल्याण आणि भिवंडीच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात चार समन्वयक नेमण्यात आले आहेत. यामध्ये अमित ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे यांच्या नावांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तीन समन्वयक नेमण्यात आले आहेत. अभिजित पानसे, किशोर शिंदे, गणेश सातपुते अशी नाशिक जिल्ह्याच्या समन्वयकांची नावे आहेत.

अभिजित पानसे यांना जळगावची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. ते जळगाव जिल्ह्याचे एकमेव समन्वयक असणार आहेत. शिरुर लोकसभेसासाठी राजेंद्र (बाबू) वागस्कर आणि अजय शिंदे यांना समन्वयक म्हणून नेण्यात आलं आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. मावळसाठी सरदसेाई यांच्यासह रणजित शिरोळे आणि अमेय खोपकर यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नितीन सरदेसाई यांना रायगड जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संदीप देशपांडे यांनाही रायगडची जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी/सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी आणि अहमदनगरसाठी बाळा नांदगावकर आणि संजय चित्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांची देखील जबाबदारी बाळा नांदगावकर यांना देण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये बाळा नांदगावकर यांच्यासोबत संतोष नागरगोजे हे देखील समन्वयक असणार आहेत.

इतर जिल्ह्यांमध्ये कुणाकुणाला समन्वयक म्हणून जबाबदारी?

बुलढाणा / अकोला / अमरावती / वर्धा / यवतमाळ – संदीप देशपांडे, राजू उंबरकर

बारामती / सोलापूर / माढा – दिलीप धोत्रे, सुधीर पाटसकर

सांगली / सातारा / कोल्हापूर / हातकणंगले – बाळा नांदगांवकर, अविनाश अभ्यंकर

धुळे / नंदुरबार – अभिजित पानसे, जयप्रकाश बाविस्कर, अशोक मुर्तडक

“सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपणाकडे जर इतर पक्षातील पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारपूस करत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमून दिलेल्या समन्वयकांशी संपर्क करून द्यावा किंवा संपर्क साधावयास सांगणे”, असा आदेश पक्षाकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.