MSRTC: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! तिकीट दरात सूट हवी असेल तर 1 ऑक्टोबर पासून…

MSRTC: एसटी महामंडळाने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून मोठा निर्णय लागू केला होता. मात्र, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मुदतवाढ केल्यानंतर 1 ऑक्टोबर ही अंतिम तारीख ठेवली आहे.

MSRTC: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! तिकीट दरात सूट हवी असेल तर 1 ऑक्टोबर पासून...
msrtc
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 9:20 AM

महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवर्गांतील प्रवाशांना एसटी प्रवासात शासकीय सवलती आता स्मार्ट कार्डद्वारेच मिळणार आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सुमारे २ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहे. यापूर्वी १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले होते. मात्र, सुरुवातीच्या काळात स्मार्ट कार्डच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. कार्ड काढणे, रिचार्ज आणि ॲक्टिव्हेशन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने प्रवाशांनी गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी कायम असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.

कोकणात गेलेल्या ३०७ बस परतल्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील ३०७ एसटी बस कोकणात पाठवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवाचा कालावधी संपल्यानंतर या बस आता विभागात परतल्या आहेत. त्यामुळे नियमित मार्गांवरील वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

सर्व्हरवरील अडचणींमुळे रिचार्जची प्रक्रिया संथ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) मागील तीन महिन्यांपासून प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे. स्मार्ट कार्डची रिचार्ज प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) सर्व्हरशी जोडलेली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने कार्डचे रिचार्ज आणि ॲक्टिव्हेशन करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे कार्ड काढलेले असूनही काही प्रवाशांना रिचार्ज किंवा ॲक्टिव्हेशन पूर्ण करण्यासाठी वाहकांकडे जावे लागत आहे. स्मार्ट कार्डमध्ये आवश्यक रक्कम रिचार्ज केल्यानंतर पात्र प्रवासात सवलत मिळणार आहे. मात्र, सर्व्हरवरील तांत्रिक अडचणींमुळे रिचार्जची प्रक्रिया संथ होत असल्याने प्रवाशांना बसस्थानकावर, तसेच बसमध्ये वाहकाकडून रिचार्ज करून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

कार्डाशिवाय सवलत मिळत नसल्याने त्रास

सरकारने एसटीच्या प्रवासी भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड बंधनकारक केल्यानंतर महिला प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. वर्षभरातून एखाद-दुसऱ्या वेळेस एटीतून प्रवास करणाऱ्या महिलांनाही आता कार्ड काढावे लागणार आहे.

सवलतीसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे

स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. आता १ ऑक्टोबरपासून एसटी प्रवासात सवलत घेण्यासाठी स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे असे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us